वसमत-मालेगाव मार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:10 IST2025-01-27T11:09:35+5:302025-01-27T11:10:02+5:30
कंत्राटदाराच्या चुकीमुळे अपघात वाढल्याचा नागरिकांचा आरोप

वसमत-मालेगाव मार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
वसमत (जि. हिंगोली): नांदेड येथून परभणीकडे निघालेल्या दुचाकीचा कन्हेरगाव फाट्याजवळील एका हॉटेल जवळ अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवार रोजी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.ही घटना रविवार रोजी रात्री घडली आहे.
वसमत-मालेगाव मार्गावरील कन्हेरगाव फाट्याजवळ असलेल्या एका हॉटेल जवळ २६ जानेवारी रोजी रात्री ९ वा नांदेड येथुन परभणीकडे जाणाऱ्या दुचाकीचा ( क्र एम एच २६ सीएल १३२०) अपघात झाला. यात दुचाकीवरील नरेंद्र राजकुमार दिक्षित ( वय २४,रा परभणी) , सुमित साहेबराव जोगदंड ( वय २५,रा गोकुळ नगर नांदेड) हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन बोराटे यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. गंभीर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दोघांची तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कंत्राटदाराच्या चुकीमुळे अपघात वाढले....
वसमत-मालेगाव मार्गाचे काम गत पाच ते सहा वर्षांपासून सुरू आहे. मार्गावरील उघडी नदी पुलाचे काम सुरू आहे. जो रस्ता झाला त्या रस्त्यावर रबर स्टक अद्याप बसवण्यात आलेले नाही. तसेच मार्गावर दिशादर्शक कुठेच नाहीत. यापुर्वीही याच ठिकाणी दुचाकीचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही राष्ट्रीय महामार्ग विभाग व कंत्राटदार यांनी दक्षता घेतली नसल्याचे चित्र आहे. कंत्राटदाराच्या चुकीमुळे अपघात वाढले असल्याचा आरोप करत वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.