देशभरात मार्च, २०२० पासून कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. या आजारापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातही १ ते ७ मार्चदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली होती. ८ मार्चपासून यात शिथिलता दिली असली तरी शाळा, महाविद्यालये बंद ठेवावेत, असे आदेशात नमूद आहे. दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहेत. परीक्षा जवळ आल्या, तरी ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे गरजेचे असून, वर्ग सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी.आर. हेंबाडे, प्रा.जी.आर. भोयर, सुधाकर मेटकर, पी.पी. सिरसाठ, रतन भोपाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मुख्याध्यापक संघाचेही निवेदन
हिंगोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघानेही दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनावर के.डी.महाजन, अ.मन्नान, सुधाकर सूर्यवाड, आब्बास पठाण, ए.एस. मईंग आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.