औंढ्यात महाशिवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:56 IST2019-03-03T00:55:50+5:302019-03-03T00:56:39+5:30

देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरात महाशिवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.

In the aftermath of the Mahashivratri festival preparations are complete | औंढ्यात महाशिवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण

औंढ्यात महाशिवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण

औंढा नागनाथ : देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरात महाशिवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा नगरपंचायतीच्या वतीने प्रथमच कुस्त्यांसह कबड्डीचे सामने आयोजित केले आहे. भाविकांची संख्या लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टिने पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून ३०० पोलिस बंदोबस्त ठेवणार आहेत.
ज्योतिर्लिंग मंदिरात २ ते ९ मार्चदरम्यान महाशिवरात्री यात्रा महोत्सव साजरा होत आहे. त्याअनुषंगाने मंदिर विश्वस्त व प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयी सुविधांसाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या काळात मंदिरात वाढती गर्दी लक्षात घेता सुलभ दर्शनाची व्यवस्था केली आहे. यात्रा काळात गर्दीमुळे गर्भगृहातील अभिषेक बंद करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता व फराळाची व्यवस्था मंदिर परिसरात केली असल्याचे मंदिर संस्थानाचे अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी सांगितले. २ मार्च रोजी एकादशीच्या कीर्तनाने शिवरात्र उत्सवास सुरूवात झाली आहे. ४ मार्चच्या मध्यरात्रीच ९ वाजता महाभिषेक करण्यात येणार आहे. रात्री २ नंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेता रात्री उशिरापर्यंत दर्शन खुले करून देण्यात येणार आहे. शिवाय ४ मार्च रोजी रात्री ८ वाजता गावातील प्रमुख मार्गावरून श्रींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पालखी मिरवणुकीत जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. ८ मार्च रोजी रात्री १० वाजता मंदिरात भव्य रथोत्सव साजरा होणार आहे. यासाठी मंदिराच्या वतीने विविध समित्यांची स्थापना केली आहे. रथ ओढण्यासाठी मंदिराच्याच कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.
यात्रा महोत्सवाच्या अनुषंगाने यंदा नगरपंचायतीच्या वतीने विविध खेळांचे आयोजन केले आहे. नगरपंचायतीच्या वतीने १ ते २ मार्च रोजी यात्रेमधील आलेल्या व्यावसायिकांना जागेचे वाटप केले आहे. शिवाय शांतता व देखरेख, जागा वाटप, कुस्ती, आरोग्य व स्वच्छता, कबड्डी व पाणीपुरवठा अशा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. ५ मार्च रोजी कबड्डीचे सामने होणार असून यासाठी प्रथम ३१ हजार, द्वितीय २१ हजार, तृतीय ११ हजार व चतुर्थ ७ हजार रुपयांच्या रोख बक्षीस व पारितोषिक दिले जाणार आह. तर ८ मार्चला कुस्त्यांच्या दंगलीसाठी प्रथम ११ हजार, द्वितीय ७ हजार तर तृतीय ५ हजार यासह १ हजार, ५००, २००, १०० रुपयांच्या अशा कुस्त्या खेळविल्या जाणार आहेत. यासाठी नगरपंचायतीने २ लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती नगराध्यक्षा सविता सतीश चोंढेकर यांनी दिली आहे. यात्रा काळात स्वच्छता व पाण्याची व्यवस्था केल्याची माहिती मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी दिली.
महाशिवरात्र काळात मंदिरात छावणीचे स्वरूप
महाशिवरात्र उत्सवासाठी देशातील विविध राज्यातून भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. त्यामुळे मंदिरात व शहरात कायदा सुव्यवस्था व सुरक्षिततेसाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी यात्रेच्या यात्रेच्या पूर्वी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेऊन नियोजन केले. सुरक्षेचा मंदिरात आढावा घेण्यात आला आहे. यात्रा काळात कोणी अफवा पसरविणे, यात्रेत गोंधळ घातल्यास त्यांची गय केली जाणार नसल्याचे वाघमारे यांनी सांगितले. २ ते ९ मार्च या महोत्सव दरम्यान मंदिर व परिसरात सुरक्षेसाठी २ डीवायएसपी, ५ पोलीस निरीक्षक, १२ सपोनि यांच्यासह १३२ पोलीस पुरूष तर ४२ महिला कर्मचारी शिवाय १०० होमगार्ड नेमणूक केली आहे. तसेच दंगा नियंत्रण, घातपात नियंत्रण, बॉम्बशोधक व नाशक पथक, स्थानिक गुन्हे शाखा अशा एकूण ३०० च्या वर पोलीस कर्मचारी औंढ्यात तळ ठोकून राहणार आहेत.

Web Title: In the aftermath of the Mahashivratri festival preparations are complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.