गृहमंत्री शाह यांच्या कॉलनंतर ठाकरेंनीही फिरविला खासदार नागेश आष्टीकरांना फोन; चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:15 IST2025-07-29T13:05:41+5:302025-07-29T13:15:01+5:30
काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार भाजपच्या गळाला लागणार, त्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू झाल्याची चर्चा होती

गृहमंत्री शाह यांच्या कॉलनंतर ठाकरेंनीही फिरविला खासदार नागेश आष्टीकरांना फोन; चर्चांना उधाण
नांदेड : हिंगोली लाेकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश आष्टीकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोन आला होता. यावेळी शाह यांनी आष्टीकरांना वयही विचारले; परंतु या फोनमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार भाजपच्या गळाला लागणार, त्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू झाल्याची चर्चा होती; परंतु त्यावेळी दिल्लीत सर्व खासदारांनी एकत्र येत फुटीच्या सर्व शक्यता फेटाळल्या होत्या; परंतु तेव्हापासूनच भाजप ठाकरे गटाच्या खासदार आणि आमदारांना आपल्याकडे खेचण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यात खासदार नागेश आष्टीकर यांना वाढदिवशी गृहमंत्री शाह यांचा फोन आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शुभेच्छांबरोबर कायम सोबत : ठाकरे
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन केल्यानंतर काही वेळातच शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील फोन फिरवत आष्टीकरांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांबरोबर त्यांनी कायम सोबत राहण्याचे आवाहन केले. त्यावेळी खासदार आष्टीकर यांनीदेखील काय विषय आहे का? साहेब म्हणत सोबत राहण्याचा शब्द दिला. त्यावेळी ठाकरे यांनी ‘जिओ हजारो साल’ तर हजार साल सोबत पण राहावे लागेल, असे म्हणत पुन्हा शुभेच्छा दिल्या.