जि.प.तील प्रकारानंतर प्रशासन अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:56 IST2018-03-23T00:27:27+5:302018-03-23T11:56:45+5:30
जिल्हा परिषदेत काल रात्री झालेल्या वादानंतर प्रशासन अलर्ट झाले आहे. खोडी म्हणून बिल निविदा टाकून नुसताच अटकाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास गंभीर कारवाई होणार आहे

जि.प.तील प्रकारानंतर प्रशासन अलर्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेत काल रात्री झालेल्या वादानंतर प्रशासन अलर्ट झाले आहे. खोडी म्हणून बिल निविदा टाकून नुसताच अटकाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास गंभीर कारवाई होणार आहे. तर मार्च एण्डला निधी परत जाणार नाही, याची काळजी घेण्याची तंबी दिली आहे.
जिल्हा परिषदेत यावेळी सदस्य मंडळी नवी आहे. त्याचा परिणाम म्हणून कंत्राटदार लॉबी काही ठिकाणी वरचढ ठरण्याचे मनसुबे ठेवत आहे. तर काही सदस्य आक्रमक असल्याने ऐन मार्च एण्डला विविध निविदांवरून वाद उभे राहत आहेत. १० ते १५ टक्के कमी दराची निविदा भरणारा कंत्राटदार उद्या अर्धवट काम सोडून गेला तर निधी व काम दोन्हीचे नुकसान होणार आहे.
जि.प. सदस्यांना आधीच अपुरा निधी असल्याने सदस्यांतून होणारी ओरड रास्त आहे. मात्र काही ठिकाणी राजकीय कुरघोडीतून कंत्राटदारांना जाणीवपूर्वक निविदा टाकण्यास सांगितले जात असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. त्यामुळे मार्च एण्डलाही हा संघर्ष कायम राहिला तर मोठा गोंधळ होवू शकतो. वादाची ही ठिणगी काही सदस्यांशी नव्हती तर पदाधिकारी असलेल्यांशी होत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी कंत्राटदारांचीही भूमिका रास्त आहे. त्यामुळे पेच वाढत आहे.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड यांनी आज आढावा घेतला. प्रशासनाने ही कामे मार्च एण्डला व्हावी व निधी परत जावू नये, याची खबरदारी घ्यावी, असे बजावले. तर निययमानुसार निविदा काढूनही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास सांगितले. तर अतिशय कमी दराची निविदा भरणाऱ्या कंत्राटदाराकडून तेवढ्या फरकाच्या रक्कमेची अनामत घ्या जेणेकरून भविष्यात हे काम दिलेल्या मुदतीआधीच खराब झाले तर दुरूस्ती करणे शक्य होईल. ही अनामत आल्यावरच कार्यारंभ आदेश देण्यास सांगितले. तर केवळ काम लटकावण्याचे धोरण ठेवणाºयांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिला आहे.