खातेदारांचे ईएमआय सरळ खिशात टाकले; मुथूट मायक्रोफिनच्या संपर्क अधिकाऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:14 IST2025-07-24T14:13:48+5:302025-07-24T14:14:45+5:30
व्यवसाय शाखा व्यवस्थापकाची पोलीस ठाण्यात तक्रार...

खातेदारांचे ईएमआय सरळ खिशात टाकले; मुथूट मायक्रोफिनच्या संपर्क अधिकाऱ्यावर गुन्हा
- इस्माईल जहागीरदार
वसमत (जि. हिंगोली) : शहरातील मुथूट मायक्रोफिन लिमिटेड कंपनीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, कंपनीच्या एका संपर्क अधिकाऱ्याने आठ खातेदारांकडून सुमारे ७५ हजार ५९० रुपयांची कर्जाची रक्कम हडप केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा वसमत शहर पोलिस ठाण्यात संबंधित अधिकाऱ्याविरोधात न्यासभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला्.
वसमत शहरात आसलेली मुथूट मायक्रोफिन लिमिटेड कंपनी बचत गटांना समूह हमीवर ५० ते ८० हजार रुपयांपर्यंत कर्ज पुरवते. या कर्जाची मासिक हप्त्यांमध्ये वसुली करण्यासाठी कंपनीने प्रत्येक भागात संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. हे अधिकारी गावांमध्ये जाऊन बचत गटातील महिलांकडून कर्जाचे हप्ते गोळा करतात. त्याची गटाच्या शेरा रजिस्टरमध्ये नोंद करतात आणि नंतर ती रक्कम कंपनीत जमा करतात.
सदर घटनेतील आरोपी संपर्क अधिकारी करण साळवे (रा. परभणी) याने ५ नोव्हेंबर ते १३ जुन २०२५ पर्यंतचे खातेदारांकडून ७५ हजार ५९० रुपयांचे हप्ते गोळा केले होते. मात्र ही रक्कम त्याने कंपनीकडे जमा केली नाही. तसेच शेरा रजिस्टरमध्येही त्याची नोंद केली नाही. कर्जाचे हप्ते थकल्याने कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी गावात जाऊन चौकशी केली असता महिलांनी आपण वेळेवर करण साळवे याच्याकडे हप्ते दिल्याचे सांगितले. परंतु साळवेने कंपनीकडे पैसे भरले नसल्याचे कळताच महिलांनी मुथुट मायक्रोफिन फायनान्स कंपनी शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार मांडली,
व्यवसाय शाखा व्यवस्थापकाची पोलीस ठाण्यात तक्रार ...
या प्रकारानंतर,मुथुट मायक्रोफिन फायनान्स कंपनीचे व्यवसाय शाखा व्यवस्थापक रमाकांत तोटावाड यांनी
तातडीने २३ जुलै रोजी रात्री शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.