तपास जलदगतीने करण्यासाठी लाच स्वीकारताना बीट जमादार एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 16:30 IST2019-06-18T16:17:53+5:302019-06-18T16:30:49+5:30
आरोपीस अटक करण्यासाठी मागितली लाच

तपास जलदगतीने करण्यासाठी लाच स्वीकारताना बीट जमादार एसीबीच्या जाळ्यात
हिंगोली : एक हजाराची लाच स्वीकारताना सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील पोलीस ठाण्याच्या बीट जमादारास लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलवर करण्यात आली.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या गुन्ह्याचा तपास जलदगतीने करणे तसेच गुन्ह्यातील आरोपींना अटक तत्काळ करण्यासाठी गोरेगाव पोलीस ठाण्याचे बीट जमादार डी. यू. शेळके यांनी पैशाची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे बीट जमादार पैसे मागत असल्याची तक्रार दाखल केली. पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळुन आले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे बीट जमादार शेळके हे हिंगोली शहरातील एका हॉटेलवर तक्रारदाराकडून पैसे घेण्यासाठी थांबले होते. यावेळी एसीबीच्या पथकाने धडक कारवाई करून बीट जमादारास तक्रारदाराकडून एक हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.