३०० क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, मुख्य आरोपी हाती लागेल का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 16:32 IST2022-10-11T16:32:30+5:302022-10-11T16:32:30+5:30
तांदूळ आणि ट्रक असा १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

३०० क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, मुख्य आरोपी हाती लागेल का?
वसमत (हिंगोली) : माळवटा फाट्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या पथकाने पाठलाग करुन काळ्या बाजारात जाणारा ३०० क्विंटल तांदूळ साठा असलेला ट्रक (क्र एमएच २६ बीई ०४१२ ) ७ ऑक्टोबरला ताब्यात घेतला होता. प्राथमिक माहितीनुसार हा साठा स्वस्थ धान्य वितरणातील आहे. अखेर या प्रकरणी चार दिवसांनंतर वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हा तांदूळ साठा राशनचा असल्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या तांदुळाचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशावरुन सोमवारी सुखदेवसिंग जिबरसिंग खैरा ( रा. उल्हासनगर ठाणे) याच्याविरुध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक व धान्य असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे धान्य शहरातून नांदेड किंवा हैद्राबाद कडे जात होते. एका विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, मुख्य आरोपींचा सुगावा अद्याप पोलीसांना लागला नाही. मुख्य आरोपी पोलीसांना सापडून त्यावर कारवाई होईल का ? हा प्रश्न समोर येत आहे.
या प्रकरणी पूर्ण तपास करण्यात येईल. धान्य कोणाचे आहे. कोठून कोठे जात होते याची माहिती घेऊन मुख्य आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
- चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे वसमत.