वायदेबाजारातून हळदीच्या व्यापारात २५ हजार कोटींचा गैरव्यवहार; राजू शेट्टी यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:00 IST2025-12-12T14:59:02+5:302025-12-12T15:00:02+5:30
या प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वायदेबाजारातून हळदीच्या व्यापारात २५ हजार कोटींचा गैरव्यवहार; राजू शेट्टी यांचा आरोप
हिंगोली : मागील दहा वर्षांमध्ये वायदेबाजारातून हळदीच्या व्यापारात २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी तसेच वायदेबाजारातून हळदीला वगळावे, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पांढरं सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस उत्पादक पिचला गेला असताना आता पिवळं सोनं म्हणून ओळखला जाणारा हळद उत्पादक शेतकरी व्यापारी व एनसीडीईएक्सच्या जाळ्यात अडकून भरडला जात आहे. देशात सर्वाधिक हळद उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. देशात जवळपास ११ ते १२ लाख मे टन हळदीचे उत्पादन होते. भारतातून सर्वाधिक हळद निर्यात होते. यावर्षी अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने हळदीला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. मात्र काही व्यापारी एनसीडीईक्सवर चालणाऱ्या वायदेबाजाराचा वापर करुन हळदीचे दर पाडण्याचे कटकारस्थान करीत आहेत. स्थानिक बाजारात हळदीचे दर जादा असून, वायदेबाजारात दर कमी दाखविले जात आहेत. मागील दहा वर्षांत व्यापाऱ्यांनी याच पद्धतीने वायदेबाजारातून हळदीचे दर पाडून २५ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची लूट केली आहे, असा आरोप या निवेदनात केला आहे.
तेव्हा राज्य व केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष घालून वायदेबाजारातून हळदीला वगळावे व १० वर्षांत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.