आदर्श शिक्षकाकडून घेतली २३ हजारांची लाच; शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकासह अधीक्षक जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 18:44 IST2022-01-13T18:44:17+5:302022-01-13T18:44:55+5:30
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या एका शिक्षकाने जादा वेतनवाढ देण्याचे आदेश काढण्यासाठी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरु केला होता.

आदर्श शिक्षकाकडून घेतली २३ हजारांची लाच; शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकासह अधीक्षक जाळ्यात
हिंगोली : आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याचे एक जादा वेतनवाढीचा मंजुरी आदेश काढल्याचा तसेच आदेशाच्या फाईलवर स्वाक्षरी केल्याचा मोबदला म्हणून एकूण २३ हजारांची लाच घेणाऱ्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यकासह कार्यालयीन अधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया होती.
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या एका शिक्षकाने जादा वेतनवाढ देण्याचे आदेश काढण्यासाठी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरु केला होता. त्यानंतर जादा वेतन वाढ देण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र जादा वेतनवाढीचा मंजुरी आदेश काढल्याचा मोबदला व मंजुरी आदेशाची प्रत देण्यासाठी शिक्षण विभागातील सचिन अजाबसिंग अडबलवार (वरिष्ठ सहायक ) याने ३० हजारांच्या लाचेची मागणी केली. तसेच संतोष उर्फ अण्णा किशनराव मिसलवार (कार्यालयीन अधीक्षक) याने वेतनवाढीच्या मंजुरी आदेशाच्या फाईलवर सही करून मदत केल्याचा मोबदला म्हणून ३ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंति सचिन अडबलवार यास २० हजार तर संतोष किसलवार यास ३ हजार रूपये देण्याचे ठरले.
मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने शिक्षकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे उपाधीक्षक निलेश सुरडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युनुस सिद्धिक, पोलीस हवालदार विजय उपरे, विजय शुक्ला, पोलीस नाईक महारूद्र कबाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तान्हाजी मुंडे, अविशना कीर्तनकार, पोलीस शिपाई राजाराम फुपाटे, सुजित देशमुख, चालक पोलीस नाईक हिम्मतराव सरनाईक यांच्या पथकाने जिल्हा परिषदेत सापळा लावला. यावेळी सचिन अडबलवार यास २० हजारांची तर संतोष मिसलवार यास ३ हजारांची लाच घेतांना पथकाने रंगेहात पकडले. लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.