कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार, ४ जानेवारी हा शेवटचा दिवस होता. यादिवशी ४५९ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले. त्यामुळे निवडणूक रिंगणात आता १,६२७ उमेदवार आहेत. तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींमधून ८७५ सदस्य निवडून द्यायचे आहेत. एकूण ३३८ प्रभाग असून, तालुक्यातील आखाडा बाळापूर, डोंगरकडा, शेवाळा या तीन सर्वात मोठ्या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. सोमवारी दुपारी तीन वाजल्यानंतर उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्हांचे वाटप केले. तालुक्यातील मालेगाव, भुरक्याची वाडी, पुयना, घोळवा या ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. निवडणूक चिन्हांकरिताही उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. एकूण ८७५ सदस्य पदांसाठी १,६२७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती तहसीलदार दत्त शेवाळे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, खोकले यांनी दिली.
कळमनुरीत तालुक्यात १६२७ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST