विचार करण्याच्या चुकीच्या पद्धती,  नकारात्मकता हा एक सर्वार्थानं घातक दृष्टिकोन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 07:36 IST2025-05-04T07:36:45+5:302025-05-04T07:36:58+5:30

आपण ट्रकच्या मागे ‘विचार बदला, नशीब बदलेल’ असं लिहिलेलं अनेकदा वाचतो. गमतीदार वाक्य म्हणून हसून सोडून देतो. पण, वास्तविक खरोखरच आपलं नशीब बदलायला, आपली मन:स्थिती बदलायला आपले विचारच कारणीभूत असतात. 

Wrong ways of thinking, negativity is an all-round dangerous attitude... | विचार करण्याच्या चुकीच्या पद्धती,  नकारात्मकता हा एक सर्वार्थानं घातक दृष्टिकोन...

विचार करण्याच्या चुकीच्या पद्धती,  नकारात्मकता हा एक सर्वार्थानं घातक दृष्टिकोन...

- डॉ. विद्याधर बापट   
मानसतज्ज्ञ 
नकारात्मकता हा एक सर्वार्थानं घातक दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन असलेली व्यक्ती एखाद्या परिस्थितीत वाईटच किंवा प्रतिकूलच घडणार, हे गृहीतच धरते. याला सिच्युएशनल पेसिमिझम म्हणतात. साधारणपणे या व्यक्ती एकूण आयुष्याबद्दल उदासीन असतात. त्यांना व्यक्तींमधल्या किंवा प्रसंगांमधल्या वाईट गोष्टीच महत्त्वाच्या वाटतात. आयुष्यात आनंदी राहता येत नाही. त्यांनी नकारात्मक विचार करण्याची पद्धत बदलून सकारात्मक विचार करण्याची पद्धत शिकून घेणं गरजेचं ठरतं आणि हे प्रयत्नांती शक्य आहे.

नकारात्मक विचार कुठल्या कुठल्या पद्धतीचे असू शकतात? 
१. घडणाऱ्या घटना, गोष्टी, वागणूक इत्यादी काळ्या-पांढऱ्या प्रकारातच पाहणे-टोकाचा विचार करणे.  काळ्या आणि पांढऱ्यामध्ये ग्रे किंवा राखाडी शेड असते, हे मान्यच नसणे. उदा. मी एखादी गोष्ट परफेक्ट केली नाही तर त्याचा अर्थ मी पूर्णपणे अपयशी आहे, असा विचार करणे.
२. एखादी चूक झाली तरीसुद्धा ‘मी एकही काम नीट करू शकत नाही’ असा विचार करणे.
३. सकारात्मक, अनुकूल घटनांकडे दुर्लक्ष करणे आणि एखाद्या नकारात्मक घटनेवर लक्ष केंद्रित करणे.
४. कौतुकास्पद काम झालं आणि कोणी अभिनंदन केलं तरी ते अभिनंदन केवळ मला बरं वाटावं म्हणून केलेलं आहे. खरंतर काम काही इतकं चांगलं झालं नाही आहे, असा विचार करणे.
५. कुठलाही सबळ पुरावा किंवा तर्कविचार हाताशी नसताना प्रतिकूल गोष्टच घडेल हा जणू निर्णयच घेऊन टाकायचा. 
६. आपल्याला जसं वाटतंय, ते खरोखरच वास्तव किंवा वस्तुस्थिती आहे, असं मानून चालणं. उदा. मी अपयशीच आहे, असं मला वाटतं. आता मला आतून तसं वाटतंय म्हणजे तसंच असलं पाहिजे.
७. स्वत:ला ‘च’च्या कुलपात अडकवून टाकणं. म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडून विशिष्ट पद्धतीनं झालीच पाहिजे. झाली‘च’ पाहिजे हा अट्टहास असतो किंवा एखादी गोष्ट माझ्याकडून होता‘च’ कामा नये. तशी ती झाली‘च’ किंवा झाली‘च’ नाही तर स्वत:वर विलक्षण चिडचिड होते.
८. पूर्वी आलेल्या लहानशा अपयशामुळे आपण म्हणजे ‘मूर्तिमंत अपयश’ असं लेबल स्वत:ला लावून टाकायचं आणि आपल्याकडून चांगलं असं काही होऊच शकणार नाही, हे ठरवून टाकायचं. 
९. काही विपरीत, प्रतिकूल घडलं किंवा काही चुकीचं घडलं, तर दोष स्वत:कडं घेण्याची प्रवृत्ती. आपणच या चुकीला जबाबदार आहोत. आपण असं वागलो म्हणून हे असं प्रतिकूल घडलं, असा विचार करण्याची सवय.
१०. आपल्या बाबतीत सगळं छान घडत असताना त्याच्याकडं दुर्लक्ष करून एखादी लहानशी कमतरता उगाळत बसणे.
आपली विचार करण्याची पद्धत वरील प्रकारांत मोडते का हे तपासायला हवं.  

Web Title: Wrong ways of thinking, negativity is an all-round dangerous attitude...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.