World Arthritis Day : सांधेदुखीचे 100पेक्षा अधिक प्रकार, पुरुषांमध्ये वयाच्या विशीत मणक्यातील संधिवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 01:00 PM2018-10-12T13:00:20+5:302018-10-12T13:00:42+5:30

World Arthritis Day : घाटी रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख चंद्रकांत थोरात यांच्याशी संवाद

World Arthritis Day : spondyloarthritis symptoms and treatment | World Arthritis Day : सांधेदुखीचे 100पेक्षा अधिक प्रकार, पुरुषांमध्ये वयाच्या विशीत मणक्यातील संधिवात

World Arthritis Day : सांधेदुखीचे 100पेक्षा अधिक प्रकार, पुरुषांमध्ये वयाच्या विशीत मणक्यातील संधिवात

googlenewsNext

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : वाढत्या वयासह जीवनशैलीतील बदल, लठ्ठपणा, फळभाज्यांच्या वाढीसाठी होणारा रासायनिक खतांचा वापर, पोषक आहाराचा अभाव, अशा अनेक कारणांनी सांधेदुखीचे प्रमाण वाढत आहे. सातत्याने सांधे दुखणे ही संधिवाताची सुरुवात असू शकते. सांधेदुखीचे शंभरापेक्षा अधिक प्रकार आहेत. त्यामुळे गंभीर स्वरूप येण्यापूर्वीच खबरदारी घेण्याची गरज असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात म्हणाले. संधिवाताबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १२ आॅक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिन म्हणून साजरा करण्यात येतो. चालण्याची दुरावलेली सवय, वाढते वजन, कमी होत चाललेल्या शारीरिक हालचाली, यामुळे भारतात संधीवाताचे प्रमाण वाढत आहे. जागतिक संधिवात दिनानिमित्त सांधेदुखीविषयी डॉ. चंद्रकांत थोरात यांच्याशी संवाद साधण्यात आला.

प्रश्न : सांधेदुखी(आर्थरायटिस) म्हणजे नेमके काय?
डॉ. चंद्रकांत थोरात :  शरीरातील सांध्यांमधील होणा-या आजारांना साधारणपणे सांधेदुखी असे म्हणतात. सांध्यातील दोन हाडांमध्ये कमीत कमी घर्षण व्हावे, यासाठी एक जाड गुळगुळीत कार्टिलेज आणि वंगणरुपी द्रव असते. वाढते वय, रोगप्रतिकारशक्तीतील बिघाड, लठ्ठपणा, अनुवंशिकता, जंतूसंसर्ग, बदलेली जीवनशैली, अशा विविध कारणांनी सांध्यातील वंगणास इजा होऊन हाडांतील घर्षण वाढते. परिणामी नसा घासून वेदना व सूज येते. सांधेदुखीची सुरुवात असल्यास वेदनांची तीव्रता वाढत जाते.

प्रश्न : सांधेदुखीचे किती प्रकार आहेत?
डॉ.चंद्रकांत थोरात: याचे शंभरपेक्षा जास्त प्रकार आहेत. वयोमानानुसार होणारा संधिवात (आॅस्टियो आर्थरायटिस), आमवात(रुमेटाईड आर्थरायटिस), रक्तातील युरिक अ‍ॅसिडच्या वाढत्या प्रमाणामुळे (गाऊट),  जंतूसंसर्गामुळे सांधेदुखी, ल्युपस, सोरायसिस आर्थरायटिस,पाठीच्या मणक्यातील सांधेदुखी असे क ाही मुख्य प्रकार आहेत. यामध्ये वयोमानानुसार होणाºया संधिवाताचे सर्वाधिक प्रमाण आहे. वयाच्या ५० ते ६० वर्षांनंतर या आजाराचे प्रमाण अधिक आहे. यात गुडघा, खुबा, मणका, हाताच्या बोटातील सांधे म्हणजे शरीरातील ज्या सांध्यावर अधिक भार असतो, ते बाधित होतात.

प्रश्न : आॅस्टियो आर्थरायटिस लक्षणे सांगता येईल?
डॉ. चंद्रकांत  थोरात : सांधे दुखणे हे प्रमुख लक्षण आहे. सांधेदुखीची तीव्रता कामाबरोबर वाढत जाणे आणि आराम दिल्यावर कमी होणे, सांध्यामध्ये अवजडपणा येणे, सांध्यांना सूज येणे, हालचाली करताना हाडांमधील घर्षण जाणवणे, प्रभावित सांध्यांत वाकडेपणा येणे, दैनंदिनी कामे करता न येणे, सांधे निसटणे ही काही लक्षणे आहेत.

प्रश्न : मणक्याचा संधिवात कधी होतो ?
डॉ. चंद्रकांत  थोरात : मणक्यातील संधिवात हा संधिवाताचा प्रकार प्रामुख्याने पुरुषांमध्ये साधारण वयाच्या विशीत होत आहे. यात पाठीच्या मध्यभागातील मणक्यांच्या हालचालीत अखंडपणा येतो.

प्रश्न : आमवात म्हणजे काय?
डॉ. चंद्रकांत  थोरात : रुमेटाईड आर्थरायटिस म्हणजे आमवात. हा दिर्घकाळ चालणारा एक गंभीर आजार आहे. यात शरीराच्या कोणत्याही सांध्यांवर परिणाम होऊ शकतो. तरीही प्रामुख्याने हातांच्या बोटांतील सांधे, मनगट, पायाचा घोटा, गुडघा, खांदा यांच्यात जास्त परिणाम दिसून येतो. तर पुरुषांच्या तुलनेत आमवाताचे प्रमाण महिलांमध्ये ३ ते ४ पटीने अधिक आहे. आमवाताचे नेमके कारण अजूनही अज्ञात आहे.

प्रश्न :  आजारांचे निदान कसे होते ?
डॉ. चंद्रकांत  थोरात : लक्षणांवरून एक्सरे, सीटी स्कॅन, एमआरआय, बोन स्कॅन, आर्थोस्कोपी, रक्ततपासणी, सीआरपी अशा विविध तपासण्यांतून निदान केले जाते. वाकडे झालेल्या सांध्याच्या उपचारात भौतिक आणि व्यावसायीक उपचार प्रभावी न पडल्यास डॉक्टरांकडून शस्त्रक्रियेचा विचार केला जातो. शस्त्रक्रियने वाकडे हात, पाय सरळ करणे, सांधा बदलणे शक्य झालेले आहे.

प्रश्न : या आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय?
डॉ. चंद्रकांत थोरात : संधिवातापासून दूर राहण्यासाठी नियमित व्यायाम, योगासन क रणे,  हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये असा संतुलित आहार, वजन आटोक्यात ठेवणे, बैठी जीवनशैली टाळणे, व्यसनांपासून दूर राहाणे, या प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला पाहिजे. सांध्यावर जास्त भार पडेल,अशी कामे टाळली पाहिजे. भौतिकपचाराद्वारे स्नायू आणि सांधे मजबूत केली पाहिजे.

Web Title: World Arthritis Day : spondyloarthritis symptoms and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.