विड्याचे पान हृदयासाठी बहुगुणी, कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ, २ वर्षांच्या संशोधनातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:26 IST2025-12-18T11:25:47+5:302025-12-18T11:26:13+5:30
विड्याच्या पानांमध्ये बाष्पशील तेलांसह अमिनो अॅसिड, कार्बोहायड्रेट, विविध जीवनसत्त्वे तसेच अँटिऑक्सिडंट व दाहशामक घटक आढळतात.

विड्याचे पान हृदयासाठी बहुगुणी, कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ, २ वर्षांच्या संशोधनातील निष्कर्ष
दुर्गेश मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हृदयविकारातील गंभीर प्रकार मानल्या जाणाऱ्या हार्ट फेल्युअर (हृदयाची कार्यक्षमता कमी होणे) या आजारावर पारंपरिक भारतीय वनस्पती असलेल्या विड्याच्या पानांचा (नागवेलीचे पान) पूरक उपचार म्हणून सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे महत्त्वपूर्ण निष्कर्ष पुण्यात करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आले आहेत. हे संशोधन आहारतज्ज्ञ डॉ. स्वाती खारतोडे यांनी पुणे येथे डिसेंबर २०२३ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत केले.
तुलनात्मक संशोधन
या अभ्यासात २४२ रुग्णांचा समावेश केला होता. यापैकी ५० टक्के रुग्णांची अॅन्जिओप्लास्टी झाली होती. रुग्णांना दोन गटांत विभागण्यात आले. एका गटाला औषधोपचार देण्यात आले, तर दुसऱ्या गटाला औषधोपचारांसोबत विड्याची पाने, ओल्या नारळाचा गर व थोडी वेलची किंवा वाळवलेल्या विड्याच्या पानांची कॅप्सूल असा पूरक आहार १२ आठवड्यांसाठी देण्यात आला.
“हा उपाय औषधांचा पर्याय नसून, औषधोपचारांना पूरक म्हणून वापरण्यात आला आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणावर आणि दीर्घकालीन संशोधनाची गरज आहे.' या अभ्यासासाठी आयुर्वेदातील ग्रंथसंपदेबाबत माहिती देण्यासाठी आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सचिन गांधी, तर सांख्यिकीय विश्लेषणासाठी अदिती देशपांडे यांनी सहकार्य केले."
- डॉ. स्वाती खारतोडे
आयुर्वेदातील 'तांबूल'ला संशोधनाचा आधार
विड्याच्या पानांमध्ये बाष्पशील तेलांसह अमिनो अॅसिड, कार्बोहायड्रेट, विविध जीवनसत्त्वे तसेच अँटिऑक्सिडंट व दाहशामक घटक आढळतात. भारतीय परंपरेत' तांबूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानाला औषधी महत्त्व आहे. नारळ व वेलची यांचा समावेश पोषणमूल्य वाढवण्यासाठी करण्यात आला. या संशोधनाच्या महत्त्वाची दखल घेत आयुष मंत्रालय, दुबई यांनी डॉ. स्वाती खारतोडे यांना हा अभ्यास आंतरराष्ट्रीय सार्वजनिक मंचावर सादर करण्यासाठी आमंत्रित केले आहे.