मृत्यूनंतरही पुन्हा जगायचंय? जर्मनीतील स्टार्टअप २ कोटींमध्ये देतंय जिवंत होण्याची सुवर्णसंधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 11:39 IST2025-08-03T11:31:19+5:302025-08-03T11:39:09+5:30
टुमॉरो बायो ही कंपनी १.७४ कोटी रुपयांमध्ये त्यांच्या ग्राहकांना मृत्यूनंतरही पुन्हा जिवंत करण्याचे आश्वासन देते.

(फोटो सौजन्य - Tomorrow Bio)
Tomorrow Bio : जर्मनीतल एक स्टार्टअप तु्म्हाला अमर बनवू शकणार आहे. बर्लिन येथील स्टार्टअप टुमॉरो बायो ही कंपनी मृत्यूनंतर मानवी शरीरांचे जतन करणारी भविष्यकालीन सेवा पुरवत आहे, ज्याचा उद्देश लोकांना जगण्याची दुसरी संधी देणे आहे. टुमॉरो बायोनुसार लोक क्रायोप्रिझर्वेशनमध्ये स्वतःला गोठवू शकतात आणि ते पुन्हा जिवंत होऊ शकतात. २००,००० डॉलर्स (१.७४ कोटी रुपये) मध्ये, कंपनी शरीराला अत्यंत कमी तापमानात गोठवून संपूर्ण क्रायोप्रिझर्वेशन देते, ज्यामुळे पेशींचे नुकसान रोखण्यास मदत होते. मृत्यूनंतर लगेच प्रक्रिया सुरू करण्यासाठी टुमॉरो बायो २४/७ आपत्कालीन स्टँडबाय टीम चालवते ज्यामुळे शरीर लवकरात लवकर कंपनीकडे पोहोचते.
भविष्यातील वैद्यकीय प्रगतीमुळे कधीतरी जतन केलेल्या व्यक्तींना पुनरुज्जीवित करणे शक्य होईल अशी टुमॉरो बायोची या मागची कल्पना आहे. टूमॉरो बायो ही युरोपातील पहिली क्रायोनिक्स लॅब आहे जी मानवी शरीर गोठवते आणि मृत्यूनंतर त्यांना पुन्हा जिवंत करत. त्याची किंमत १.७४ कोटी रुपये असणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला फक्त त्याचा मेंदू गोठवायचा असेल तर त्याची किंमत ६७.२ लाख रुपये आहे.
‘बायोस्टॅसिस’साठी मृतदेह क्रायोप्रिझर्वेशनमध्ये मायनस १९८° सेल्सिअस तापमानात ठेवण्याची कंपनीची कल्पना आहे. या तापमानाला सर्व जैविक प्रक्रिया अनिश्चित काळासाठी थांबवल्या जातात. त्यानंतर कंपनीने म्हटल्याप्रमाणे, या प्रक्रिया भविष्यात स्वेच्छेने पुन्हा सुरू करता येतात आणि मृत्यूचे कारण बरे करता येते.
पण क्रायोप्रिझर्वेशन ही प्रक्रिया गोठवण्यासारखी नाही. त्यात बर्फात गोठवण्या प्रक्रिया नाही कारण ते शरीरासाठी हानिकारक असू शकते. तर बर्फाच्या स्फटिकांची निर्मिती रोखण्यासाठी एक विशेष क्रायोप्रोटेक्टंट द्रावण (द्रव नायट्रोजन) सोडले जाते. एकदा तापमान शून्य अंशांपेक्षा कमी झाले की शरीर गोठवले जात नाही. ते क्रायोप्रिझर्व केले जाते. जर असं केलं नाही तर शरीरातील ऊती नष्ट होतात.
कंपनीच्या वेबसाईटनुसार, टुमॉरो बायोला असे जग निर्माण करायचे आहे ज्यात लोक कुठे आहेत, कोण आहेत आणि त्यांच्या आर्थिक संसाधनांची पर्वा न करता त्यांना किती काळ जगायचे आहे ते निवडू शकतील.
माध्यमांच्या वृत्तानुसार, कंपनीचा दावा आहे की सहा लोक आणि पाच पाळीव प्राण्यांना आधीच क्रायोप्रिझर्वेशन अंतर्गत ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, या प्रक्रियेसाठी पैसे भरुन ६५० हून अधिक लोक रांगेत उभे आहेत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होताच कंपनी ही प्रक्रिया सुरू करते. विविध युरोपीय शहरांमध्ये असलेल्या खास रुग्णवाहिकांमधून त्यांना स्वित्झर्लंडमधील मुख्य सेंटरमध्ये पोहोचवते. या कामासाठी कंपनीने बर्लिन, अॅमस्टरडॅम आणि झुरिच येथे स्टँडबाय टीम तैनात केल्या आहेत.
व्यक्तीचा मृतदेह स्वित्झर्लंडमधील रॅफ्झ येथील मुख्य केंद्रात हलवला जातो आणि पुढील दहा दिवसांसाठी -१९६ अंश सेल्सिअस (-०.८२ अंश फॅरेनहाइट) तापमानात द्रव नायट्रोजनने भरलेल्या ३.२ मीटर उंच स्टीलच्या व्हॅक्यूम-इन्सुलेटेड कंटेनरमध्ये ठेवला जातो.