वेगवेगळे व्हिटॅमिन्स हे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांसाठी महत्त्वपूर्ण असतात. या व्हिटॅमिन्समुळे शरीराची क्रिया योग्यप्रकारे सुरु राहते. या व्हिटॅमिन्सची कमतरता आल्यास शरीरात वेगवेगळ्या समस्या दिसू लागतात. या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण व्हिटॅमिन्समध्ये व्हिटॅमिन सी हे आवश्यक पोषक तत्त्व आहे. याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवली जाते. व्हिटॅमिन सी एक शक्तीशाली अॅंटी-ऑक्सिडेंट आहे. जे शरीराच्या प्रवाह तंत्राची क्रिया योग्य ठेवतं. तसेच याने नव्या पेशींची निर्मितीही केली जाते. त्यामुळे त्वचा हेल्दी राहते. पण व्हिटॅमिन सी ची शरीरात कमतरता आली तर काही बदल बघायला मिळतात. ते काय हे जाणून घेऊ...
केसगळती आणि नखे कमजोर होतात
जर तुम्ही सततच्या केसगळतीने हैराण आहात आणि नखे तुटत असल्यानेही चिंतीत आहात तर ही समस्या व्हिॅटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होत आहे. व्हिटॅमिन सी केसांना मजबूती देणाऱ्या कोलेजन आणि प्रोटीनला नियंत्रित करण्याचं काम करतं. जर व्हिटॅमिन सी फारच कमी झालं असेल तर केसगळती फार जास्त वाढू शकते.
हिरड्यांमध्ये सूज
रोज वेगवेगळ्या पदार्थांमधून व्हिटॅमिन सी चं सेवन केल्यास तुमचे दात आणि हिरड्या निरोगी राहू शकतात. पण हे व्हिटॅमिन शरीरात कमी झालं किंवा याचं योग्यप्रमाणात सेवन न केल्यास हिरड्या सूजणे किंवा त्यातून रक्त येणे अशा समस्या होऊ शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास तुमची समस्या अधिक वाढू शकते.
अंगदुखी
जर तुम्हाला सतत अंगदुखीची समस्या होत असेल तर तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण अंगदुखी आणि सांधेदुखी या समस्या शरीरात व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतात. मुळात व्हिटॅमिन सी आपल्या हाडांना मजबूती देतं. पण ते कमी झाल्यास याने आपले कार्टिलेज कमजोर होऊ लागतात आणि याने सतत अंगदुखीची समस्या होत राहते.
रखरखीत त्वचा
जर तुमची त्वचा रखरखीत, निर्जीव दिसत असेल तर असं होण्यालाही व्हिटॅमिन सी ची कमतरता हे कारण असू शकतं. तुम्हाला सतत पिंपल्स येत असतील तर त्यालाही व्हिटॅमिन सी ची कमतरता हेच कारण असू शकतं. व्हिटॅमिन सीमुळे आपली त्वचा चांगली होते आणि वाढत्या वयाचे संकेत दिसत नाहीत. तसेच त्वचेवर सुरकुत्याही येत नाहीत.
थकवा
व्हिटॅमिन सी कमतरता असेल तर तुम्हाला सतत थकवा जाणवू शकतो. तुमचं मन कामात लागत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन सी तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्रियेसाठी फार गरजेचं असतं. हे व्हिटॅमिन कमी झालं तर तुम्हाला जास्त थकवा जाणवू शकतो.
हृदयरोग
व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका वाढतो. कारण याने आपल्या नसा आणि पेशींच्या क्रियेला आधार मिळतो. तसेच व्हिटॅमिन सीमुळे रक्तही शुद्ध होतं आणि शरीरातून विषारी तत्व बाहेर काढण्यासही मदत मिळते.