लठ्ठपणा हा सगळ्यांसाठीच एक मोठी समस्या ठरतो मग ते पुरूष असो वा महिला. सामान्यपणे असं पाहिलं जातं की, लग्नानंतर पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये लठ्ठपणा अधिक वाढतो. हे सर्वांनाच माहीत आहे की, लग्नाआधी तरूणी स्वत:ला फिट आणि स्लिम ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण लग्नानंतर त्यांचं वजन वाढू लागतं. हे वाढलेलं वजन त्यांच्यासाठी समस्या बनलेलं असतं. पण लग्नानंतर महिलांचं वजन वाढण्याची कारणे काय आहेत? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...
हार्मोन्समध्ये बदल
लग्नानंतर अनेक गोष्टी बदलत असल्याने महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात. त्यासोबतच महिला सेक्शुअल लाइफमध्येही अॅक्टिव्ह होतात. या कारणानेही वजन वाढू लागतं. तसेच गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनामुळेही वजन वाढू लागतं.
पुरेशी झोप न मिळणे
लग्नानंतर जास्तीत जास्त महिलांच्या झोपण्याच्या वेळेत बदल होतात. वेगवेगळी कामे उरकून त्यांना झोप घ्यावी लागते. अशावेळी त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. आणि पुरेशी झोप न मिळाल्यानेच त्यांचं वजन वाढू लागतं.
बदलत्या प्राथमिकता
लग्नानंतर मुलींच्या प्राथमिकता बदलतात. त्यांना त्यांच्या पतीनुसार आणि घरातील सदस्यांनुसार दिनचर्या ठेवावी लागते. त्यामुळे त्या स्वत:ची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळेही त्यांचं वजन वाढतं.
तणाव
लग्नानंतर तरूणींना आपलं आई-वडिलांचं घर सोडून पतीच्या घरी जावं लागतं. दुसऱ्या लोकांसोबत आणि दुसऱ्या घरात अॅडजस्ट होणं हे सोपं नसतं. यासाठी बराच वेळ लागतो. दरम्यान तरूणींना तणावाचा सामना करावा लागतो आणि त्यामुळेही वजन वाढतं.
सामाजिक दबाव
लग्नाआधी तरूणी बऱ्यापैकी मोकळ्या वातावरणात असतात. तेच लग्नानंतर सासुरवाडीत अनेकप्रकारच्या जबाबदाऱ्या आणि सामाजिक दबाव यामुळे त्यांचं त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हेच दुर्लक्ष करणं त्यांचं वजन वाढण्याला कारण ठरतं.
गर्भधारणा
गर्भवती असल्यावर महिलांचं वजन वाढणं स्वाभाविक आहे. पण असं बघितलं जातं की, बाळाच्या जन्मानंतर महिला आपलं वजन कमी करण्यासाठी फारसे प्रयत्न करताना दिसत नाहीत. किंवा असे म्हणूया की, त्यांना तशी संधी मिळत नाही. तसेच शरीरात अनेक बदल होतात, यामुळे त्यांचं वजन वाढतं.
फिटनेसबाबत निष्काळजीपणा
लग्नाआधी फिटनेसबाबत जागृत असणाऱ्या महिला लग्नानंतर मात्र फिटनेसकडे फार दुर्लक्ष करताना दिसतात. त्यांना यासाठी पुरेसा वेळ न मिळणे हेही कारण असतं. तसेच त्या घर परिवारात अधिक बिझी होतात.
खाण्या-पिण्यात बदल
घरातील कामामुळे खाण्या-पिण्यावर व्यवस्थित लक्ष न देणं आणि शिळं अन्न खाणं यामुळेही महिलांमध्ये लग्नानंतर जाडेपणा वाढतो. तसेच बाहेरूनही अधिक मागवून खाल्लं जातं. त्यामुळे शरीरात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्सची कमतरता होऊ लागते.