Diabetes मधुमेहाबद्दल आहेत 'या' अफवा...तुम्हीही कधीतरी फसले असणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 18:31 IST2022-11-13T18:29:48+5:302022-11-13T18:31:30+5:30
अजुनही अनेकांना मधुमेहाबद्दल पूर्ण माहिती नाही. इकडचे तिकडचे ऐकून आपण काही गोष्टी खऱ्या मानतो, नको ते उपाय करतो आणि भलतंच होऊन बसतं.

Diabetes मधुमेहाबद्दल आहेत 'या' अफवा...तुम्हीही कधीतरी फसले असणार!
Diabetes गेल्या काही काळापासून मधुमेहाचे प्रमाण बरेच वाढले आहे. अगदी तरुण वयातही मधुमेहाचे निदान होत आहे. जवळपास प्रत्येक दुसऱ्या गरात मधुमेहाचे रुग्ण आहेत. याला अनेक कारणे असु शकतात. मधुमेह हा आनुवंशिक असु शकतो मात्र नेहमीच असे होत नाही. बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, वाढते वजन हे देखील कारणीभुत ठरते.
अजुनही अनेकांना मधुमेहाबद्दल पूर्ण माहिती नाही. इकडचे तिकडचे ऐकून आपण काही गोष्टी खऱ्या मानतो, नको ते उपाय करतो आणि भलतंच होऊन बसतं. बघुया मधुमेहाबाबत कोणती चुकीची माहिती पसरली आहे ज्यावर तुम्हीही कधीतरी विश्वास ठेवलाच असेल.
कुटुंबात कोणाला मधुमेह नाही तर धोका नाही
हे खरे आहे की मधुमेह बऱ्याचदा आनुवंशिक असतो. आई वडील, भाऊ बहिण यांच्यापैकी कोणाला मधुमेह असेल तर तुम्हालाही धोका अधिक असतो. मात्र जर कुटुंबात कोणालाही मधुमेह नसेल तर तुम्हालाही होणार नाही हे चुकीचे आहे. स्थुलता, अतिप्रमाणात गोड पदार्थ खाणे, शारिरीक कार्य कमी असणे यामुळे तुम्हाला मधुमेह होऊ शकतो.
मधुमेह असलेल्या रुग्णांनी भात, बटाटा खाऊ नये
मधुमेहासंदर्भात अनेक पथ्य आहेत मात्र ते सगळेच खरे नाहीत. भात आणि बटाटा यांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते म्हणून ते अजिबात खाऊ नये.
मात्र या गोष्टी १०० टक्के वर्ज्य नाहीत. कार्बोहायड्रेट शरीरात ऊर्जा निर्माण करतात. ते नसेल तर थकवा जाणवू शकतो. त्यामुळे कार्बोहायड्रेटचे नियंत्रित सेवन करु शकता.
साखरेचे प्रमाण योग्य झाल्यानंतर मधुमेहाचे औषधे घेण्याची गरज नाही
मधुमेहाचे अनेक रुग्ण ही चुक करतात. साखर कंट्रोल मध्ये आल्यानंतर स्वत:च गोळ्या, इन्सुलिन घेणे बंद करतात. डॉक्टर या सवयीला खुपच गंभीर समजतात. मधुमेह पूर्ण बरा होत नाही, गोळ्यांनीच तो नियंत्रणात राहतो. अशावेळी साखरेचे प्रमाण अचानक झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. काही अवयव निकामी देखील होऊ शकतात. डॉक्टरांना न सांगता औषधे बंद करु नये.
मधुमेह केवळ पचन आणि रक्ताची समस्या आहे
पचनक्रियेत होणाऱ्या त्रासामुळे मधुमेह होतो रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यामध्ये डोळे, किडनी, यकृत यांना धोका असतो. त्यामुळे हे केवळ एखाद्या अवयवापुरते मर्यादित राहत नाही तर हळूहळू इतर अवयवांनाही धोका असतो. म्हणून मधुमेहाचे उपचार बंद करु नये.