डिप्रेशनचे रहस्य उलगडलं! मेंदूतील फक्त दोन पेशी कारणीभूत; उपचार होणार अधिक सोपे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 05:56 IST2025-10-15T05:56:50+5:302025-10-15T05:56:57+5:30
वैज्ञानिकांनी मृत व्यक्तींच्या मेंदूच्या ऊतींवर हे संशोधन केले. नैराश्यग्रस्त लोकांच्या मेंदूतील न्यूरॉन्स व मायक्रोग्लियाची जनुकीय क्रिया सामान्य व्यक्तींपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी असते.

डिप्रेशनचे रहस्य उलगडलं! मेंदूतील फक्त दोन पेशी कारणीभूत; उपचार होणार अधिक सोपे
टोरोंटो : जगभरातील लाखो लोक नैराश्य (डिप्रेशन) या मानसिक आजाराशी झुंज देत आहेत. आता कॅनडातील वैज्ञानिकांनी या आजाराच्या मुळाशी असलेले एक महत्त्वाचे रहस्य उलगडले आहे. नव्या संशोधनानुसार, डिप्रेशनचा संबंध मेंदूतील दोन विशिष्ट प्रकारच्या पेशींशी, मायक्रोग्लिया व न्यूरॉन्स यांच्याशी जोडलेला आहे.
वैज्ञानिकांनी मृत व्यक्तींच्या मेंदूच्या ऊतींवर हे संशोधन केले. नैराश्यग्रस्त लोकांच्या मेंदूतील न्यूरॉन्स व मायक्रोग्लियाची जनुकीय क्रिया सामान्य व्यक्तींपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी असते. दोन्हीमध्ये स्पष्ट बदल दिसले, ज्यामुळे उपचारांसाठी नवीन मार्ग उघडू शकतात.
उपचारांना मिळेल दिशा
या शोधामुळे आता वैज्ञानिकांना डिप्रेशनच्या उपचारासाठी अधिक नेमके लक्ष्य मिळाले आहे.
आता औषधे मेंदूतील सर्व रासायनिक घटकांवर परिणाम करण्याऐवजी फक्त त्या पेशींवर परिणाम करतील, ज्या डिप्रेशनशी संबंधित आहेत.
यामुळे उपचारांचे दुष्परिणाम कमी होतील आणि प्रभाव वाढेल. संशोधक या पेशी एकमेकांशी कशा प्रकारे संवाद साधतात हे समजून घेण्याचाही प्रयत्न करत आहेत.
मानसिकच नव्हे, जैविक कारणही स्पष्ट
आजपर्यंत डिप्रेशनला फक्त मानसिक किंवा भावनिक आजार मानले जात होते. परंतु या संशोधनाने हे अधोरेखित केले आहे की डिप्रेशनचा संबंध मेंदूतील रासायनिक आणि संरचनात्मक बदलांशी आहे.
संशोधनाचे प्रमुख लेखक
डॉ. गुस्तावो तुरेकी यांनी सांगितले, “हे अध्ययन दर्शवते की डिप्रेशनमध्ये मेंदूतील कोणत्या भागात आणि पेशींमध्ये बिघाड होतो. त्यामुळे हा आजार केवळ मानसिक नाही, तर जैविक स्वरूपाचाही आहे.”