स्क्रीन टाइमचा सापळा: तुम्हीही अडकलात का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 10:18 IST2026-03-22T10:18:24+5:302026-03-22T10:18:46+5:30

आपला स्क्रीन टाइम आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम तर करत नाही ना?

the screen time trap are you trapped too know impact on life | स्क्रीन टाइमचा सापळा: तुम्हीही अडकलात का? 

स्क्रीन टाइमचा सापळा: तुम्हीही अडकलात का? 

सकाळी उठताच मोबाइल तपासणे, दिवसभर अधूनमधून नोटिफिकेशन्स पाहणे आणि रात्री झोपण्याआधी पुन्हा स्क्रीनकडे नजर वळवणे ही सवय आज बहुतेकांच्या जीवनाचा भाग झाली आहे. मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट किंवा टीव्ही या सारख्या उपकरणांनी आपल्याला माहिती, मनोरंजन आणि संवादाच्या असंख्य शक्यता दिल्या. काम, शिक्षण, सामाजिक संबंध आणि विरंगुळा या सगळ्यांसाठी आपण स्क्रीनवर अवलंबून झालो आहोत.

मात्र, या सोयीसोबत एक गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे, आपला स्क्रीन टाइम आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम तर करत नाही ना? नकळत वाढत जाणारा स्क्रीन टाइम आपल्या जीवनशैलीत, आरोग्यात, विचारप्रक्रियेत आणि नातेसंबंधांत सूक्ष्म, पण खोल बदल घडवतो आहे. म्हणूनच, हा केवळ सवयीचा प्रश्न नसून जीवनाच्या गुणवत्तेशी संबंधित गंभीर मुद्दा ठरत आहे.  

झोपेच्या पॅटर्नमध्ये बदल 

अनेकजण रात्री झोपण्याआधी ‘फक्त पाच मिनिटं’ म्हणून मोबाइल हातात घेतात आणि त्यात सहज तास-दोन तास निघून जातात. सोशल मीडिया, व्हिडीओ किंवा वेब सिरीजमुळे मेंदू  सक्रिय राहतो. स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश मेलाटोनिन हा झोपेसाठी आवश्यक हार्मोनच्या निर्मितीत अडथळा आणतो. परिणामी झोप उशिरा लागते, गाढ झोप लागत नाही आणि सकाळी उठल्यानंतरही शरीर-मन ताजेतवाने वाटत नाही. हे दुष्परिणाम आरोग्यासाठी गंभीर आहेत. 

उत्पादकतेत घट 

सतत फोन तपासण्याची सवय ही एक प्रकारची ‘डिजिटल व्यसनाधीनता’ बनू लागते. काम करताना दर काही मिनिटांनी नोटिफिकेशन पाहणे, सोशल मीडिया उघडणे किंवा एखाद्या व्हिडीओमध्ये गुंतून जाणे यामुळे एकाग्रता पूर्णपणे भंगते.
संशोधनानुसार, एकदा एकाग्रता तुटली की पुन्हा त्याच स्तरावर पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे कामाचा वेग आणि गुणवत्ता दोन्ही कमी होतात. दीर्घकाळात ही सवय व्यावसायिक प्रगतीत अडथळा ठरू शकते.

मानसिक आरोग्यावर परिणाम 

सोशल मीडियावरील परिपूर्ण दिसणाऱ्या आयुष्यांच्या तुलनेत स्वतःचे आयुष्य अपूर्ण वाटू लागते. ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’ (FOMO), लाइक्स-फॉलोअर्सची चिंता, अपडेट राहण्याची धडपड या गोष्टी मनावर ताण आणतात. हीच गोष्ट आत्मविश्वास कमी होण्यास अन् नैराश्याच्या दिशेने जाण्यास कारणीभूत ठरते. विशेषतः तरुण पिढीमध्ये हा परिणाम अधिक गंभीर स्वरुपात दिसतो.

शारीरिक आरोग्यावर परिणाम 

दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो, कोरडेपणा जाणवतो आणि दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. ‘टेक्स्ट नेक’मुळे मानदुखी, पाठीचे त्रास वाढतात. सतत बसून राहण्याची सवय लागल्याने शारीरिक हालचाल कमी होते, ज्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. शरीर आणि मन यांच्यातील संतुलन ढासळू लागते.

नातेसंबंधांवर परिणाम 

एकाच घरात राहूनही प्रत्येकजण आपल्या स्क्रीनमध्ये गुंतलेला दिसतो. प्रत्यक्ष संवाद कमी होतो, भावना व्यक्त करण्याची सवय कमी होते आणि नात्यांमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होतो. ‘ऑनलाइन कनेक्टेड’ असूनही ‘इमोशनली डिस्कनेक्टेड’ होण्याची ही प्रक्रिया अधिक धोकादायक आहे.

स्वतःशी संवाद तुटतो 

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःशी तुटत जाणारा संवाद. स्क्रीनवर गुंतल्यामुळे आपण स्वतःसोबत शांतपणे बसणं, विचार करणं, काही सर्जनशील करणं या गोष्टी विसरत चाललो आहोत. मन बाह्य उत्तेजनांवर अवलंबून राहू लागते, ज्याने अंतर्मुख होण्याची क्षमता कमी होते.

मग बदल कसा घडवायचा? 

सर्वप्रथम, दिवसातून किती वेळ आपण स्क्रीनवर घालवतो, हे तपासणं हा पहिला टप्पा आहे. त्यानंतर अॅप लिमिट्स सेट करणे, अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करणे, ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोड वापरणे यामुळे स्क्रीनचा वापर नियंत्रित करता येतो. 

यासोबतच, पर्यायी सवयी लावा. वाचन, व्यायाम, ध्यान, छंद या गोष्टी मनाला स्थैर्य देतात व स्क्रीनवरील अवलंबित्व कमी करतात. एक दिवस ‘डिजिटल डिटॉक्स’ ठेवणे हा प्रभावी उपाय आहे.
 

Web Title : स्क्रीन टाइम का जाल: क्या आप फंसे हैं? अब नियंत्रण करें!

Web Summary : अत्यधिक स्क्रीन टाइम नींद, उत्पादकता, मानसिक और शारीरिक स्वास्थ्य और रिश्तों को प्रभावित करता है। डिजिटल लत फोकस को प्रभावित करती है, तनाव, आंखों में खिंचाव और अकेलापन पैदा करती है। ऐप सीमाएं, डिजिटल डिटॉक्स और शौक से उपयोग नियंत्रित करें।

Web Title : Screen Time Trap: Are you caught? Limit screen usage now!

Web Summary : Excessive screen time impacts sleep, productivity, mental & physical health, and relationships. Digital addiction affects focus, causing stress, eye strain & loneliness. Control usage through app limits, digital detox & alternative hobbies.