काचबिंदू गंभीरपणे घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:50 IST2025-03-16T12:50:04+5:302025-03-16T12:50:40+5:30
दरवर्षी १० मार्च ते १६ मार्च काचबिंदू सप्ताह पाळून अंधत्व आणणाऱ्या आजाराबाबत जनजागृती केली जाते. आज या सप्ताहाची समाप्ती होत आहे, त्यानिमित्त..

काचबिंदू गंभीरपणे घ्या...
डॉ. तात्याराव लहाने, वरिष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ -
काचबिंदू (ग्लुकोमा) हा डोळ्यांचा एक गंभीर आजार आहे. या आजारात डोळ्यातील अंतस्राव बाहेर जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. पाणी आतच साठून राहिल्याने डोळ्याचा दाब वाढतो. त्यामुळे ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होऊन हळूहळू अंधत्व येऊ शकते.
भारतामध्ये दरवर्षी या आजाराचे १ कोटी २० लाखांहून जास्त रुग्ण आढळतात. महाराष्ट्रातील अचूक रुग्णसंख्या उपलब्ध नसली तरी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्ररुग्णालयीन अभ्यासानुसार राज्यात काचबिंदू होण्याचे प्रमाण ७.२ टक्के (४० वर्षांपूर्वी ५ टक्के आणि ४० वर्षांनंतर १० टक्के) इतके आहे.
ठाणे जिल्ह्यातील एका अहवालानुसार, महाराष्ट्रात काचबिंदूमुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण २.०६ टक्के इतके आहे. ते देशातील १.९९ टक्के प्रमाणापेक्षा थोडे जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये काचबिंदूचे साधारणतः ८० लाख रुग्ण आहेत.त्यातील २५ लाख रुग्ण संपूर्ण अंध किंवा त्यांची दृष्टी ३/६० पेक्षा कमी असू शकते. तसेच एका अहवालानुसार, फक्त सोलापूर शहरातच २० हजारपेक्षा अधिक काचबिंदूचे रुग्ण असल्याची नोंद आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात काचबिंदूमुळे अंधत्व येण्याचे प्रमाण १२ टक्के आहे आणि महाराष्ट्रातही हे प्रमाण तुलनात्मक आहे. हळूहळू या आजाराच्या रुग्णांमध्ये लक्षणीयरित्या वाढ हाेत आहे. हा आजार हाेण्याचे वयही अलिकडे आले आहे. यामुळे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच या आजाराविषयी गांभिर्याने घेतले पाहिजे.
काचबिंदूचे निदान
या आजाराची सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना तसेच पूर्वी कुटुंबातील कुणाला काचबिंदूचा आजार झाला असल्यास त्याचबरोबर मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींनी नियमित नेत्रतपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
चाचण्या कोणत्या?
१. नेत्रदाब तपासणी – डोळ्यांचा दाब मोजला जातो.
२. ऑप्टिक नर्व्ह तपासणी – डोळ्यांच्या नसांची हानी झाली आहे का, ते पाहिले जाते.
३. दृष्टिक्षेत्र चाचणी – डोळ्यांची परिघीय दृष्टी कमी झाली आहे का, हे तपासले जाते.
४. कॉर्नियल (बुबुळाची) जाडी चाचणी – कॉर्निया किती जाड किंवा पातळ आहे, हे तपासले जाते.
५. गोनियोस्कोपी – डोळ्यांच्या ड्रेनेज सिस्टीममध्ये अडथळा आहे का, हे पाहण्यासाठी ही चाचणी केली जाते.
काचबिंदूचे मुख्य प्रकार आणि लक्षणे
१. ओपन अँगल ग्लुकोमा (सर्वसामान्य प्रकार)
सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत.
हळूहळू परिघीय दृष्टी कमी होते.
उशिरा लक्षात आल्यास मध्यभागीही दृष्टी गमावली जाऊ शकते.
२. अँगल-क्लोजर ग्लुकोमा (अचानक उद्भवणारा प्रकार)
डोळ्यांत तीव्र वेदना आणि दडपण जाणवते.
डोळे लाल होतात.
डोळ्यांसमोर धूसर किंवा प्रकाशाभोवती इंद्रधनुष्याचे वलय दिसते.
डोकेदुखी आणि मळमळ.
३. जन्मजात काचबिंदू (लहान मुलांमध्ये)
डोळे मोठे आणि फुगलेले दिसतात.
सतत पाणी येते आणि प्रकाश सहन होत नाही.
दृष्टी अस्पष्ट, अपूर्ण राहते.
काचबिंदूच्या उपचारातील प्रगती :
१. मायक्रो-इनव्हेसिव्ह ग्लुकोमा सर्जरी
पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत कमी आक्रमक असलेल्या तंत्रांच्या मदतीने डोळ्यांच्या दाबाचे नियंत्रण अधिक सुरक्षित आणि जलद पुनर्प्राप्तीसह केले जाते.
२. नवीन औषधोपचार :
नेत्रदाब कमी करण्यासाठी नवीन औषधे आणि डोळ्यांचे थेंब विकसित केले गेले आहेत, ज्यामुळे रुग्णांना अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
३. लेझर थेरपीतील सुधारणा:
सेलेक्टिव्ह लेझर ट्रॅबेक्युलोप्लास्टीसारख्या तंत्राच्या मदतीने नेत्रदाब नियंत्रित करण्यासाठी अधिक अचूक आणि कमी जोखीम असलेले उपचार उपलब्ध झाले आहेत.