फुप्फुस सांभाळा, कॅन्सरचे सावट वाढले; भारतात ७४ पैकी एकाला आजाराचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:03 IST2025-11-26T12:02:29+5:302025-11-26T12:03:36+5:30
फुप्फुसाचा कर्करोग धूम्रपान करणाऱ्यां पुरता मर्यादित राहिलेला नाही. वायुप्रदूषण, रासायनिक वायू व सूक्ष्मकण हे मोठे कारण ठरत आहेत.

फुप्फुस सांभाळा, कॅन्सरचे सावट वाढले; भारतात ७४ पैकी एकाला आजाराचा धोका
नवी दिल्ली : फुप्फुसाचा कर्करोग हा भारतातील चौथा सर्वाधिक घातक कर्करोग आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मते, देशातील प्रत्येक ७४ व्यक्तींमधील एकाला आयुष्यात फुप्फुसाच्या कर्करोगाचा सामना करावा लागू शकतो. विशेष म्हणजे ४० ते ५० टक्के रुग्ण हे असे आहेत, ज्यांनी कधीही धूम्रपान केलेले नाही.
नोव्हेंबर हा फुप्फुसाच्या कर्करोगाबाबत जागरूकतेचा महिना मानला जातो. डॉक्टरांच्या मते, फुप्फुसाचा कर्करोग केवळ धूम्रपान करणाऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. फुप्फुसाचा कर्करोग हा भारतीय पुरुषांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सर्व कर्करोगांपैकी सुमारे ११ टक्के प्रकरणे ही फुप्फुसाच्या कर्करोगाची आहेत. महिलांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग जवळपास ४ टक्के प्रकरणांत आढळतो. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग सर्वाधिक आहे. एकूण कर्करोग रुग्णांपैकी ३०.१ टक्के रुग्ण स्तनाच्या कर्करोगाचे असतात. ५० वर्षांखालील लोकांमध्येही कर्करोग वाढताना दिसतो.
शरीरातील या पाच भागांना कर्करोगाचा जास्त धोका
पचन संस्था १९.७१% (प्रत्येक ३९ व्यक्तींमध्ये १)
स्तन १५.१७% (प्रत्येक ५६ पैकी १)
जनन संस्था १४.९४% (५३ पैकी १)
तोंड व घसा १३.५८% (५२ पैकी १)
फुप्फुसे ९.७९% (७४ पैकी १)