१० दिवस कडक उपवास करताना स्वत:चे आरोग्यही जपा; प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे ठरू शकते महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 10:38 IST2025-09-22T10:37:20+5:302025-09-22T10:38:01+5:30
उपवासात सफरचंद, पेरू, पपई, द्राक्षे, खजूर यांसारखी फळे खाणे ऊर्जा टिकवण्यास मदत करते

१० दिवस कडक उपवास करताना स्वत:चे आरोग्यही जपा; प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे ठरू शकते महागात
मुंबई : नवरात्रोत्सव हा श्रद्धेचा आणि साधनेचा काळ आहे. नऊ दिवसांच्या या पर्वामध्ये अनेकजण उपवास करतात. मात्र, उपवास करताना आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे काही महत्त्वाच्या आहार आणि जीवनशैलीसंबंधी टिप्स जाणून घेणे आवश्यक आहे.
उपवासाचे स्वरूप प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळे असते. काही जण पूर्ण कडक उपवास करतात, तर काही फलाहार करतात. त्यामुळे उपवास करताना ऊर्जा टिकवणे, पचनसंस्था ठीक ठेवणे आणि डिहायड्रेशन टाळणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉक्टरांनी केले.
फलाहार, सुकामेवा, ताक उत्तम
उपवासात सफरचंद, पेरू, पपई, द्राक्षे, खजूर यांसारखी फळे खाणे ऊर्जा टिकवण्यास मदत करते. बदाम, अक्रोड, काजू हे सुके मेवे प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. उपवासासाठी राजगिरा, साबुदाणा यांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषणमूल्ये मिळतात. दूध, ताक, दही, पनीर यासारखे दुग्धजन्य पदार्थ
हे प्रोटीन व कॅल्शियम देणारे असल्यामुळे यांचा वापर उपयुक्त ठरतो.
खाण्याची वेळ ठरवा
भरपेट जेवण टाळा आणि दर दोन ते तीन तासांनी काही ना काही हलके खा. त्यामुळे पोटावर ताण येत नाही आणि आम्लपित्त होण्याचा धोका कमी होतो.
तेलकट, तुपकट, गोड पदार्थांना घाला मुरड
साबुदाणा खिचडी, वडे, पापड हे पदार्थ अत्यंत चविष्ट असले, तरी त्यातील तळणीमुळे पचनावर ताण येतो. त्यामुळे शक्य असल्यास कमी तेलात पदार्थ तयार करा. तसेच फार गोड पदार्थ खाल्ल्यास रक्तातील साखरेचा स्तर झपाट्याने वाढतो, हे टाळा.
पाणी पिणे विसरू नका
उपवासात तहान कमी लागते असे वाटते, पण प्रत्यक्षात शरीर डिहायड्रेट होते. त्यासाठी दिवसभरात आठ ते १० ग्लास पाणी, नारळपाणी, लिंबूपाणी, पन्हे अशा नैसर्गिक पेयांचा समावेश करा. चहा-कॉफीसारख्या कॅफिनयुक्त पेयांचे सेवन कमी करा.
...तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड किंवा अन्य गंभीर आजार असलेल्यांनी उपवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपवासावेळी चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे ही लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उपवास हा डिटॉक्सिफिकेशनचा एक नैसर्गिक मार्ग आहे. पण, यासाठी योग्य आहार घेणे अत्यावश्यक आहे. शरीराला आवश्यक ती ऊर्जा, पाणी आणि पोषण मिळाले, तर उपवास अधिक लाभदायक ठरतो. नवरात्राच्या उपवासात श्रद्धेसोबत शारीरिक स्वास्थ्याचीही तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.
डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल