(Image Credit : eventbrite.co.uk)
सकाळी सकाळी झोपेतून कामावर जाणं तसं तर कुणाला आवडत नाही. कारण सकाळीच चांगली साखर झोप लागलेली असते. पण काय करणार मन मारून सकाळी उठावं लागतं आणि ऑफिससाठी तयार व्हावं लागतं. अनेकजण सकाळी उठतात पण काहींना सकाळी झोपेतून उठणं फारच कठिण होऊन जातं. त्यामुळे हे लोक अलार्म बंद करून पुन्हा झोपतात. झोप मोडून उठावं लागल्याने दिवसही फार काही चांगला जात नाही. पण यावर एक रिसर्च नुकताच करण्यात आलाय.
जर सकाळी तुमची झोप होत नसेल आणि त्यामुळे सुस्ती, आळस जाणवत असेल. फ्रेशनेस वाटत नसेल तर सुमधूर संगीताचा अलार्म तुमची मदत करू शकतो. जर झोपेतून उठण्यासाठी तुम्ही सुमधूर संगीत असलेला अलार्म लावला तर याने तुमची सुस्ती तर जाईल तसेच आळसही दूर होऊन दिवसभर मूड चांगला राहील.
‘पीएलओएस वन’ नावाच्या जर्नलमध्ये एक रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. हा रिसर्च ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी केलाय. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, म्युझिकल अलार्म ऐकून जर व्यक्ती झोपेतून जागा होत असेल तर याने त्या व्यक्तीच्या सजगतेचा स्तर वाढेल म्हणजे ती व्यक्ती जास्त अलर्ट राहू शकते.
ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी युनिव्हर्सिटीमध्ये असोसिएट प्रोफेसर एडरियान डायर म्हणाले की, 'झोपेत उठल्यावर बिप बिप असा किंवा कर्कश आवाज ऐकून मेंदूची गतिविधी भ्रमित होते. तर सुमधूर आवाजाच्या व्हायब्रेशनने आपण चांगल्या प्रकारे झोपेतून उठू शकतो'.
रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, म्युझिकल अलार्म ऐकून उठणे त्या लोकांसाठी खास ठरू शकतं जे लोक उठल्यावर जास्त मेहनतीच्या किंवा जास्त स्ट्रेस असलेल्या कामावर जातात. या सुमधूर संगीताने तुमचं डोकं शांत राहील आणि तुमचा दिवसही चांगला जाईल.