भावा, सलग चार तास बसणे, सिगारेट ओढण्याइतकेच धोक्याचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 14:29 IST2022-08-19T14:25:43+5:302022-08-19T14:29:12+5:30
कामाचा ताण एवढा असतो की त्यांना त्या कामातून १० मिनिटे उठायला वेळ मिळत नाही. मात्र, या सगळ्या प्रकारचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन लठ्ठपणासारख्या आजारांना सामोरे जावे लागते.

भावा, सलग चार तास बसणे, सिगारेट ओढण्याइतकेच धोक्याचे
मुंबई : काही नागरिक विशेष करून सध्याचे तरुण बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामाला आहेत, ते सलग ४-६ तास बसून काम करत असतात. कामाचा ताण एवढा असतो की त्यांना त्या कामातून १० मिनिटे उठायला वेळ मिळत नाही. मात्र, या सगळ्या प्रकारचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन लठ्ठपणासारख्या आजारांना सामोरे जावे लागते.
व्यायामाचा अभाव, त्याशिवाय एकाच जागी बसून काम करणे, अतिप्रमाणात जंक फूडचे सेवन या विचित्र जीवनशैलीचा परिणाम अनेकदा हृदयावर होताना दिसून येतो. त्यामुळे अशा पद्धतीने एकाच ठिकाणी अनेक तास काम करत बसणे हे सिगारेट ओढण्याइतकेच धोकादायक असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा
गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचे वय कमी झाले आहे. दहा वर्षांपूर्वी सर्वसामान्यत: हृदय विकार ५० ते ५५ वर्षांच्या पुढील व्यक्तींना होत असे. मात्र, सध्या हृदयविकार तरूणपणात बळावल्याचे दिसत आहे. ३० ते ३५ वयोगटातील तरुणांना हृदयाच्या विकारांमुळे रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जेव्हा कॉर्पोरेट कंपनी या वयातील तरुणास जेव्हा कामावर रुजू होण्यास सांगते त्यावेळी त्याच्या वैद्यकीय तपासण्या करून घेत असते. यामध्ये हृदयाच्या तपासण्याही ते करून घेत असतात.
हायपरटेन्शनमुळे विविध आजार जडण्याची भीती
सलग बसून काम केल्याने आणि कुठलीही शारीरिक हालचाल न केल्यामुळे या तरुणांमध्ये लठ्ठपणा वाढताना दिसत आहे. त्यामुळे मधुमेह आणि अतिताणाच्या कामामुळे हायपरटेन्शनच्या व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यातूनच हृदयविकाराच्या व्याधी सुरू होतात.
अनेकवेळा डॉक्टर सल्ला देत असतात एका ठिकाणी जास्त वेळ बसून काम करू नका. काही जण बसून त्याच ठिकाणी धूम्रपान करतात त्याचाही थेट हृदयविकाराशी संबंध आहे.
माहिती तंत्रज्ञान, जाहिरात आणि व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना एकाच ठिकाणी बसून काम करावे लागते. यामुळे डोळ्यांचे विकारही बळावू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी प्रथम शरीराला व्यायामाची सवय लावली पाहिजे. आरोग्यदायी नसलेल्या या आधुनिक जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज आहे.
चाळीशीनंतर हृदय वेळोवेळी तपासून घ्यायलाच हवे
सतत छातीत दुखणे, छातीतून हात, मान, पाठ, पोट याकडे जाणाऱ्या मार्गात दुखणे, चक्कर येणे, खोकल्याची उबळ येऊन जोरजोरात श्वास घ्यावा लागणे, दरदरून घाम येणे, अस्वस्थ वाटणे, अशी काही लक्षणे दिसत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. वयाच्या चाळीशीनंतर हृदयाची तपासणी करून घेतली पाहिजे.
रोज ३० मिनिटे चाला
- दररोज ३० मिनिटे वेगाने चालणे हा एक हृदयाची काळजी घेण्याचा चांगला उपाय आहे.
- संतुलित आहारासोबत व्यायाम करणे. मात्र व्यायामाचा अतिरेक नको. आपल्या शारीरिक प्रकृतीनुसार व्यायाम करणे ज्यामुळे शरीराला कुठलीही दुखापत होणार नाही याची काळजी घेणे.
- आहारात मीठ कमी घेणे, जंकफूड खाऊ नये. रस्त्यावरील तळलेले कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नयेत.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास तसेच संतुलित आहार घेतल्यास आजार जवळपास फिरकणारही नाहीत.