कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 09:04 IST2025-11-02T09:02:26+5:302025-11-02T09:04:32+5:30

या आजाराबद्दल समाजात अजूनही भीती, गैरसमज आणि भेदभाव कायम आहे

Once diagnosed with leprosy registration is mandatory Public Health Department decision | कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय

कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कुष्ठरोगाला ‘नोटिफायबल डिसीज’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद आता दोन आठवड्यांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहायक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग तसेच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणे आता सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक आहे.

कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरीयम लेप्री या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्वचा, नसा, डोळे आणि इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो. या आजाराबद्दल समाजात अजूनही भीती, गैरसमज आणि भेदभाव कायम आहेत. या आजाराचे निदान लवकर न झाल्यास आणि उपचारात विलंब झाल्यास रुग्णांमध्ये विकृती (दर्जा २ डिसॅबिलिटी) निर्माण होते. त्यामुळे वेळेत निदान आणि संपूर्ण औषधोपचार हे कुष्ठरोग नियंत्रणाचे प्रमुख घटक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभागाने  सन २०२७ पर्यंत ‘कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये संसर्गाची साखळी पूर्णपणे तोडणे, प्रसार शून्यावर आणणे, मुलांमधील विकृतीचे प्रमाण शून्य करणे आणि कुष्ठरुग्णांविषयी समाजातील भेदभाव नष्ट करणे आदी बाबींचा समावेश आहे. कुष्ठरोग नियंत्रणासाठी सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील सर्व डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी निदान झालेल्या सर्व रुग्णांचा योग्य उपचार, पाठपुरावा तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (पीईपी) देणे आवश्यक आहे.

सप्टेंबर २०२५ अखेर ७,८६३ कुष्ठरुग्णांची नोंद

सध्याच्या घडीला, सप्टेंबर २०२५ अखेर राज्यात ७,८६३ नव्या कुष्ठरुग्णांची नोंद झाली असून उपचाराखालील रुग्णांची संख्या १३,०१० आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना कुष्ठरोग निदान व नोंदणीसंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनाही कुष्ठरोगाबाबत भीती बाळगू नये, लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कारण हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. केवळ वेळेत निदान आणि उपचार आवश्यक आहे, असे सांगण्यात आले आहे.

Web Title : कुष्ठरोग निदान अनिवार्य; सार्वजनिक स्वास्थ्य विभाग का महत्वपूर्ण निर्णय

Web Summary : महाराष्ट्र में कुष्ठरोग के समय पर इलाज और नियंत्रण के लिए दो सप्ताह के भीतर मामलों की अधिसूचना अनिवार्य है। 2027 तक कुष्ठरोग मुक्त राज्य का लक्ष्य, सार्वजनिक स्वास्थ्य विभाग डॉक्टरों से मामलों को तुरंत दर्ज करने और निवारक देखभाल प्रदान करने का आग्रह करता है। वर्तमान में, 13,000 से अधिक रोगियों का इलाज चल रहा है; शीघ्र निदान महत्वपूर्ण है।

Web Title : Leprosy Diagnosis Now Mandatory; Public Health Department's Crucial Decision

Web Summary : Maharashtra mandates leprosy case notification within two weeks for timely treatment and control. Aiming for a leprosy-free state by 2027, the Public Health Department urges doctors to register cases promptly and provide preventive care. Currently, over 13,000 patients are under treatment; early diagnosis is key.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य