Omicron: ओमायक्रॉनचा फायदा! इतर व्हेरिअंट्स ठरतो प्रभावी, ICMR ने अभ्यासाद्वारे केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 18:39 IST2022-01-28T18:35:39+5:302022-01-28T18:39:35+5:30
आयसीएमआर (ICMR) अर्थात भारतीय आयुर्विज्ञान/वैद्यक संशोधन परिषदेच्या संशोधनातल्या निष्कर्षाने मोठा दिलासा दिला आहे. आयसीएमआरनं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असं आढळलं आहे की, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभावी प्रतिकारशक्ती (Immunity) विकसित होत असून, ती फक्त ओमिक्रॉनच नाही तर विषाणूच्या डेल्टासह (Delta) इतर प्रकारांनाही निष्प्रभ करू शकते.

Omicron: ओमायक्रॉनचा फायदा! इतर व्हेरिअंट्स ठरतो प्रभावी, ICMR ने अभ्यासाद्वारे केला दावा
मुंबई सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा वेगानं संसर्ग होत आहे. युरोप, अमेरिका आदी देशांसह आपल्या देशातही ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले बरेच रुग्ण आढळत आहेत. रुग्णसंख्या वाढीच्या या वेगामुळे चिंतेची परिस्थिती निर्माण झाली असतानाच आयसीएमआर (ICMR) अर्थात भारतीय आयुर्विज्ञान/वैद्यक संशोधन परिषदेच्या संशोधनातल्या निष्कर्षाने मोठा दिलासा दिला आहे.
आयसीएमआरनं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असं आढळलं आहे की, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभावी प्रतिकारशक्ती (Immunity) विकसित होत असून, ती फक्त ओमिक्रॉनच नाही तर विषाणूच्या डेल्टासह (Delta) इतर प्रकारांनाही निष्प्रभ करू शकते. यामुळे डेल्टा या प्रकारापासून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. यामुळे संसर्ग वाढवण्यातलं डेल्टा व्हॅरिएंटचं प्राबल्य संपुष्टात येईल, असं या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 26 जानेवारी रोजी बायो-Arxiv प्रीप्रिंट सर्व्हरवर हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, आयसीएमआरनं या संशोधनासाठी एकूण 39 व्यक्तींचा अभ्यास केला. त्यापैकी 25 जणांनी अॅस्ट्राझेनेकाच्या (AstraZeneca) लशीचे दोन्ही डोस घेतले होते, तर आठ जणांनी फायझरच्या (Pfizer) लशीचे दोन्ही डोस घेतले होते. सहा जणांनी कोणतीही लस घेतलेली नव्हती. याशिवाय या 39 व्यक्तींपैकी 28 व्यक्ती संयुक्त अरब अमिराती, आफ्रिकन देश, मध्य आशिया, अमेरिका आणि ब्रिटनमधून भारतात आले होते. 11 व्यक्ती संसर्गग्रस्त व्यक्तींच्या सहवासात आल्या होत्या.
या सर्वांना ओमिक्रॉनची लागण झाली होती. मूळ कोरोना विषाणूचा पुन्हा संसर्ग होण्यासाठी आयजीजी अँटीबॉडी (igg Antibody) आणि न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी (NAB) या प्रतिक्रियेचा अभ्यास करण्यात आला. त्यात असं आढळून आलं, की ओमिक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ती विकसित झाली असून, त्यामुळे ओमिक्रॉन आणि डेल्टासह इतर प्रकारचे कोरोना विषाणू निष्प्रभ होऊ शकतात. लसीकरण न केलेल्या समूहातल्या व्यक्तींची संख्या कमी असल्याने आणि संसर्गानंतर बरं होण्यापर्यंतचा कालावधी कमी असल्यानं हे शक्य झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. लसीकरण न केलेल्या व्यक्तींमध्ये ओमिक्रॉनविरुद्ध प्रतिकारशक्ती कमी होण्याचं हे एक कारण असू शकतं, असंही यात म्हटलं आहे.
सध्या अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca), मॉडर्ना (Moderna), फायझर (Pfizer) यांसह अनेक कंपन्या प्रगत लस बनवण्याचा प्रयत्न करत असून, मार्चच्या अखेरीस नवीन, अधिक प्रगत लस येईल, अशी अपेक्षा आहे. या अभ्यास अहवालाच्या आधारे ओमिक्रॉनला लक्ष्य करून लस बनविण्यावर भर द्यावा अशी सूचना आयसीएमआरनं केली आहे.