आता आरोग्यात होणारे बदल तत्काळ समजणार; मुंबई विद्यापीठामध्ये आरोग्य निरीक्षण उपकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:59 IST2025-12-20T12:58:53+5:302025-12-20T12:59:41+5:30
हृदयगती, शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी, रक्तदाब यांसारख्या आरोग्यविषयक मोजमाप उपकरणामुळे करता येईल.

आता आरोग्यात होणारे बदल तत्काळ समजणार; मुंबई विद्यापीठामध्ये आरोग्य निरीक्षण उपकरण
मुंबई : मुंबई विद्यापीठाने पोर्टेबल आरोग्य निरीक्षण उपकरणाचे (हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाईस) डिझाईन तयार केले असून, ते हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, मेडिकल डिव्हाइसेस आणि अप्लाइड इंजिनिअरिंग या क्षेत्रांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. त्याची युनायटेड किंगडममध्ये नोंदणी करण्यात आली आहे. याद्वारे तयार होणारे डिव्हाईस रुग्णांच्या आरोग्य स्थितीवर सातत्याने व अचूक लक्ष ठेवण्यासाठी वापरले जाणार आहे.
हृदयगती, शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी, रक्तदाब यांसारख्या आरोग्यविषयक मोजमाप उपकरणामुळे करता येईल. रुग्णालये, दवाखाने, तसेच घरगुती उपचार व्यवस्थेमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांची स्थिती सहजपणे पाहता येईल. आरोग्यात होणारे बदल त्वरित लक्षात येऊन संभाव्य धोके वेळीच ओळखता येतील. दूरस्थ उपचार प्रणालीत रुग्णांची माहिती सुरक्षितपणे डॉक्टरांपर्यंत पोहोचता येईल. वृद्ध, दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण व अतिदक्षता उपचारात याचा उपयोग होईल. एकूणच हे उपकरण रुग्णसेवा अधिक प्रभावी, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी विकसित करण्यात आले असून, आरोग्यसेवा वितरण प्रणालीत बदल घडवण्याची क्षमता त्यामध्ये असल्याचे संशोधक डॉ. श्रीवरमंगई रामानुजम यांनी सांगितले.
संशोधन का उपयुक्त?
आरोग्य निरीक्षण प्रणाली, वैद्यकीय उपकरणे आणि डिजिटल हेल्थ उपाययोजना यांद्वारे रुग्ण निरीक्षण, निदान प्रक्रिया व आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे.
डिझाइन हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, मेडिकल डिव्हाइसेस आणि अप्लाइड इंजिनिअरिंग या क्षेत्रांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
भविष्यात डिझाइन आरोग्य तंत्रज्ञान कंपन्यांना लायसन्स देणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट व नोंदणी करून संरक्षण विस्तारण्याची शक्यताही तपासली जाईल.
डिझाइन कोणी केले?
माहिती तंत्रज्ञान विभागातील विभागप्रमुख डॉ. श्रीवरंमगई रामानुजम, सात सदस्यीय संशोधन चमूने पोर्टेबल 'आरोग्य निरीक्षण उपकरण'चे नावीन्यपूर्ण डिझाईन तयार केले आहे. डॉ. नीलम शर्मा, अभिजित सुधाकर, डॉ. रवी शंकर पांडेय, डॉ. उपेन्द्र कुमार, डॉ. राजीव रंजन राय आणि डॉ. नितीश पाठक यांनी संशोधनासाठी योगदान दिले आहे.
लवकरच उपकरणाची पडताळणी
डिझाइन नोंदणीनंतर पुढील टप्प्यात उपकरणाच्या प्रोटोटाइपची पडताळणी, क्लिनिकल किंवा फील्ड चाचण्या, तसेच कार्यात्मक बाबींसाठी पेटंट संरक्षण घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.