Monkeypox Symptoms: 'मंकीपॉक्स'च्या रुग्णांमध्ये दोन नव्या लक्षणांची भर, काळजी घ्या आणि सतर्क राहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 19:45 IST2022-07-29T19:44:31+5:302022-07-29T19:45:57+5:30
कोरोनामध्येच आता मंकीपॉक्सच्या एन्ट्रीनं चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार (WHO) आतापर्यंत ७८ देशांमध्ये मंकीपॉक्सच्या १८,००० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

Monkeypox Symptoms: 'मंकीपॉक्स'च्या रुग्णांमध्ये दोन नव्या लक्षणांची भर, काळजी घ्या आणि सतर्क राहा!
कोरोनामध्येच आता मंकीपॉक्सच्या एन्ट्रीनं चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार (WHO) आतापर्यंत ७८ देशांमध्ये मंकीपॉक्सच्या १८,००० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 'मंकीपॉक्स'ला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या विषाणूची लागण झाल्यावर ताप, डोकेदुखी आणि अंगावर पुरळ उठण्याची समस्या उद्भवते. हा विषाणू खूप जुना आहे आणि तेव्हापासून या तीन समस्या प्रामुख्याने बहुतेक रुग्णांमध्ये दिसून येतात, परंतु आता 'मंकीपॉक्स'ची काही नवीन लक्षणं देखील दिसून येत आहेत.
ब्रिटनमध्ये 'मंकीपॉक्स'च्या १९७ रुग्णांवर संशोधन करण्यात आले आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. अभ्यासात 'मंकीपॉक्स'च्या रुग्णांमध्ये दोन नवीन लक्षणे आढळून आली आहेत. पहिलं म्हणजे गुदाशय किंवा गुदाशयातील वेदना आणि दुसरं म्हणजे पेनाइल एडेमा (लिंगात वेदना न होता सूज येणे) या दोन लक्षणांचा समावेश आहे. "मंकीपॉक्सच्या संशयितांच्या तपासणीत आणि उपचारांमध्ये या दोन लक्षणांवरही लक्ष ठेवावं लागेल. हे देखील लक्षणांच्या यादीमध्ये समाविष्ट करणं आवश्यक आहे. या आधारेही रुग्णांवर उपचार करावे लागणार आहेत. जर एखाद्या व्यक्तीला अशी कोणतीही समस्या येत असेल तर त्याला संशयास्पद मानून मंकीपॉक्सची चाचणी केली जाऊ शकते", असं मंकीपॉक्सवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
शारीरिक संबंध ठेवल्यामुळे ही लक्षणे असू शकतात
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 'मंकीपॉक्स'चे सुमारे 99 टक्के रुग्ण हे समलिंगी पुरुष आहेत. एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. अंशुमन कुमार यांच्या मते मंकीपॉक्स पसरण्याची तीन कारणे आहेत. यापैकी पहिला संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे, दुसरा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या पुरळ किंवा त्याच्याशी जवळचा संपर्क आणि तिसरा लैंगिक संभोगातून येणे.
डॉ. अंशुमन यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या पुरुषाला मंकीपॉक्सची लागण झाली असेल, तर त्याच्या शरीरात पुरळ येण्यास तीन ते पाच दिवस लागू शकतात, परंतु यादरम्यान त्याचे दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध असल्यास वीर्यातून विषाणू पसरू शकतो. "मंकीपॉक्स हा एचआयव्ही सारखा लैंगिक संक्रमित आजार नाही, परंतु अमेरिका आणि यूके सारख्या देशांमध्ये समलिंगी पुरुष आणि एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर ठेवणाऱ्यांमध्ये मंकीपॉक्सचे प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलं आहे", असं डॉ. कुमार म्हणाले.