कॅन्सरच्या गाठीवर आता एमआयबीजीचा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:29 IST2025-06-28T20:29:30+5:302025-06-28T20:29:49+5:30

एमआयबीजी म्हणजे काय? रुग्णाबाबत काय घेतात काळजी?

Meta iodobenzylguanidine is now a cure for cancer tumors | कॅन्सरच्या गाठीवर आता एमआयबीजीचा उपाय

कॅन्सरच्या गाठीवर आता एमआयबीजीचा उपाय

Cancer Tumors : सर्वसाधारणपणे न्यूरोब्लास्टोमा हा एक प्रकारचा कर्करोग (कॅन्सर) आहे, जो विशेषतः लहान मुलांमध्ये आढळतो. यामध्ये शरीराच्या विविध भागांवर गाठ तयार होते. त्यावर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी, सेल्स ट्रान्सप्लांट आणि इम्युनोथेरपीचा वापर केला जातो. तसेच, त्यासोबत मेटा आयोडोबेंझिलग्खानिडीन या औषधाच्या (एमआयबीजी) थेरपीचा वापर केला जातो. १७ वर्षीय रुग्णामध्ये या औषधाची मात्रा वाढवून उपचार केले असून, त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहे. देशामध्ये प्रथमच टाटा रुग्णालयाने अशा प्रकारे उपचार केले आहेत.

न्यूरोब्लास्टोमाच्या रुग्णांमध्ये उपचाराचा भाग म्हणून एमआयबीजी थेरपीचा वापर केला जातो. इंजेक्शनच्या साहाय्याने हे औषध रुग्णाला दिले जाते. देशात एमआयबीजी इंजेक्शनची ३०० मिलिक्युरीज इतकी मात्रा देण्यास अणुऊर्जा नियामक मंडळाने (एईआरबी) परवानगी दिलेली आहे. मात्र, प्रगत देशातील रुग्णालयात या उपचारासाठी औषधाची अधिक मात्रा दिली जाते. त्याचे परिणामही चांगले दिसून आले आहे. टाटा रुग्णालयातील या १७ वर्षीय रुग्णाला सुद्धा या अशा पद्धतीची या औषधाची अधिकची मात्रा देण्याची योजना तयार केली. मात्र, त्यासाठी असणाऱ्या सर्व परवानगी घेऊन त्यांनी ८०० मिलिक्युरीज इतकी मात्रा देण्याचा निर्णय घेतला.

पाच दिवसांनी दिला डिस्चार्ज

डॉक्टरांनी या रुग्णाला ४०० मिलिक्युरीज मात्रा असलेले दोन एमआयबीजी इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याला विलगीकरण करून एका विशेष कक्षात ठेवण्यात आले. पाच दिवसांनंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. २१ दिवसांनंतर त्याच्या शरीरातील स्टेम सेल्स कमी झाल्याने २४ दिवशी त्याला ऑटोलॉगस हेमॅटोपोएटिक स्टेम सेल्स देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

याप्रकरणी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक यांनी सांगितले की, एमआयबीजी इंजेक्शनची उच्च मात्रा देण्याचा निर्णय भारतात पहिल्यांदाच करण्यात आला. यामुळे रुग्णाची प्रकृती चांगली झाली. 

ही थेरपी यशस्वी ठरली आहे. याकरिता टाटा रुग्णालय आणि खारघर येथील ऍक्टरेक या दोन्ही संस्थेतील डॉक्टरांचे मी अभिनंदन करतो.

एमआयबीजी म्हणजे काय? रुग्णाबाबत काय घेतात काळजी?

एमआयबीजी हे एक औषधसदृश संयुग आहे जे विशेषतः न्यूरोएंडोक्राइन पेशींमध्ये शोषले जाते. त्याचा उपयोग प्रामुख्याने कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी केला जातो.

हे औषध दिल्यानंतर रुग्णाच्या शरीरातून, तसेच विष्ठेतून गॅमा किरण उत्सर्जित होण्याची शक्यता असते, याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकते. त्यामुळे मोठी काळजी घेतली जाते. या रुग्णाला विशेष कक्षात ठेवले जाते.

Web Title: Meta iodobenzylguanidine is now a cure for cancer tumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.