Kawasaki Disease: कावासाकीचं कोरोनाशी काय आहे 'कनेक्शन'?; जाणून घ्या या आजाराबद्दल सर्व काही...
By कुणाल गवाणकर | Updated: July 13, 2020 13:17 IST2020-07-12T11:52:58+5:302020-07-13T13:17:35+5:30
Kawasaki Disease and Treatment: लहान मुलांना होणारा कावासाकी आजार जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे त्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे.

Kawasaki Disease: कावासाकीचं कोरोनाशी काय आहे 'कनेक्शन'?; जाणून घ्या या आजाराबद्दल सर्व काही...
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत असून रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. जगातील कोरोना रुग्णांचा आकडा सव्वा कोटींच्या पुढे गेला आहे. त्यात आता कावासाकी आजारामुळे (Kawasaki Disease) पालकांची चिंता वाढली आहे. लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या या आजाराचे रुग्ण भारतातही आढळू लागले आहेत. मुंबईत एका कावासाकीग्रस्त मुलीवर कोकिलाबेन रुग्णालयात यशस्वी उपचार (Kawasaki Disease Treatment) झाले. या आजाराबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी 'लोकमत'नं कोकिलाबेन रुग्णालयातल्या बालरोगजज्ज्ञ आणि सल्लागार डॉ. प्रीथा जोशी यांच्याशी संपर्क साधला. कावासाकी आजाराची तीव्रता, त्याचं नेमकं स्वरूप, लक्षणं याबद्दल जोशी यांनी महत्त्वाची माहिती दिली.
* कावासाकी आजार नेमका काय? त्याची लक्षणं कोणती?
>> कावासाकी आजार नवा नाही. तो ४० ते ५० वर्षे जुना आहे. मात्र कोरोनातून बऱ्या झालेल्या मुलांमध्ये कावासाकी आढळून येत असल्यानं चिंता वाढली आहे. कोरोना संपून गेल्यावर ३ ते ४ आठवड्यांनंतर कावासाकी आजार होऊ शकतो. ताप, अंगावर लालसर चट्टे, चिडचिड करणं, अस्वस्थ वाटणं ही कोरोना नंतरच्या कावासाकी सदृश्य आजाराची मुख्य लक्षणं (Kawasaki Disease Symptoms) आहेत. कावासाकी झाल्यानंतर मुलांचा रक्तदाब कमी होतो. किडनीवर परिणाम होतो. त्यांना आयसीयूची गरज भासू शकते. कावासाकी आजार ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना व्हायचा आणि आजही होतो. मात्र कोरोनानंतर होणारा कावासाकी आजार ५ ते १५ वयोगटातल्या मुलांना होत असल्याचं दिसून आलं आहे. याला कावासाकीसदृश्य आजार म्हटलं जातं.
* रोगप्रतिकारशक्ती उत्तम असलेल्या व्यक्तींना कोरोना होत नाही, असं म्हटलं जातं. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न अनेकांकडून सुरू आहेत. तसं काही कावासाकीच्या बाबतीत आहे का?
>> अद्याप अशी कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. अमेरिका, युरोपमध्ये दोन-तीन महिन्यांपासून कावासाकीच्या केसेस आढळून येत आहेत. आपल्याकडे आणि तिथेही कावासाकी रुग्णांची संख्या कमी आहे. अमेरिकेत २००, तर ब्रिटनमध्ये १२० जणांना कावासाकी आजार झाला आहे. कुपोषण, स्थूलत्व असल्यानं कावासाकी आजार झाला. अशाच मुलांना हा आजार होतो, असं अद्याप तरी सिद्ध झालेलं नाही. रक्तदाब, मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींना कोरोना होतो, असं दिसून आलं आहे. कावासाकीचं तसं नाही. हा आजार झालेली मुलं तंदुरुस्त आहेत. त्यामुळे कावासाकीवर लवकरात लवकर उपचार करणं इतकंच सध्या तरी आपल्या हाती आहे.
* कोकिलाबेन रुग्णालयात कावासाकीग्रस्त मुलगी दाखल झाली होती. तिच्याबाबतीत नेमकं काय घडलं होतं?
>> रुग्णालयात यशस्वी उपचार झालेली मुलगी १४ वर्षांची आहे. तिच्या वडिलांना महिनाभरापूर्वी ताप आला होता. त्या मुलीलादेखील दोन-तीन दिवस ताप आला. त्यानंतर महिन्याभरानंतर कावासाकीची लक्षणं आढळून आली. त्यामुळे आम्ही मुलीच्या आणि वडिलांच्या शरीरातील अँटीबॉडीज तपासल्या. त्या पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. या मुलीचा रक्तदाब अतिशय कमी झाला होता.
* कावासाकी किती गंभीर आहे? त्याचे शरीरावर नेमके किती आणि कसे परिणाम होतात?
>> कावासाकीमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांना सूज येते. ही सूज कमी न झाल्यास तिथे गाठी होण्याचा धोका निर्माण होतो. तसं झाल्यास हृदयाला होणाऱ्या रक्त पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाला मोठा धोका पोहोचू शकतो. परिस्थिती गंभीर झाल्यास ओपन हार्ट सर्जरीदेखील करावी लागू शकते. किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्याचा फटका इतर अवयवांना बसण्याची शक्यता असते. उपचारांना उशीर झाल्यास कावासाकी जीवघेणा ठरू शकतो.
* कावासाकीची लक्षणं आढळून आल्यास नेमकं काय करावं?
>> कावासाकी आजाराची लक्षणं आढळून आल्यास तातडीनं बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा. त्या डॉक्टरांनी याची माहिती आयसीयूची सुविधा असलेल्या रुग्णालयांना देणं गरजेचं आहे. कावासाकी आजार झालेल्या मुलांना मल्टीस्पेशॅलिटी रुग्णालयात दाखल केल्यास तिथे त्यांच्यावर व्यवस्थित उपचार होऊ शकतात. कारण या परिस्थितीत आयसीयू टीम, कार्डिओ स्पेशलिस्ट, किडनी स्पेशलिस्ट, रिनल स्पेशलिस्ट अशा सगळ्यांची गरज भासते.
* कावासाकी किती दिवसांत बरा होतो?
>> कावासाकी साधारणत: ७ ते १० दिवसांत बरा होतो. अमेरिका, ब्रिटन आणि आपल्या देशातल्या केसेसमधून हेच दिसून आलं आहे. कावासाकी झाल्यानंतर वेळेवर उपचार मिळणं गरजेचं आहे. वेळेवर उपचार मिळाल्यास स्थिती लवकर सुधारते. मात्र पुढे फॉलो अप घ्यावा लागतो.
* कावासाकीवर उपचारांना किती खर्च येतो?
>> कावासाकी आजाराच्या तीव्रतेवर उपचार आणि त्यांना येणारा खर्च अवलंबून असतो. आजाराची सुरुवात असल्यास केवळ स्टीरॉईड्स वापरूनही मुलं बरी होतात. मात्र परिस्थिती गंभीर झाल्यास, हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर परिणाम झाल्यास इम्युनोग्लोबलिनचा वापर करावा लागतो. पाच ग्राम इम्युनोग्लोबलिनची किंमत १५ ते २० हजार रुपये आहे. रुग्णाच्या शरीराच्या वजनावर इम्युनोग्लोबलिनचा वापर ठरलेला असतो. एका किलोमागे २ ग्राम असं त्याचं प्रमाण आहे. म्हणजे रुग्णाचं वजन १० किलो असल्यास २० ग्राम इम्युनोग्लोबलिनची आवश्यकता असते. याशिवाय आयसीयूचादेखील खर्च असतो.
* आपली यंत्रणा कावासाकीसाठी किती सज्ज आहे?
>> कावासाकी झालेल्या मुलांना आयसीयूची गरज भासू शकते. आपल्याकडे दर १० आयसीयू बेडमागे १ बेड लहान मुलांसाठी असतो. बाकीचे बेड प्रौढांसाठी असतात. मात्र कावासाकी झालेल्या प्रत्येकाला आयसीयू बेडची गरज लागेलच असं नाही. कोरोनाचा फैलाव वेगानं होतो. कावासाकीचा फैलाव होत नाही. कारण विषाणू तुमच्या शरीरातून गेल्यानंतर त्याचे परिणाम म्हणजे कावासाकी आजार. विषाणूच शरीरात नसल्यानं फैलाव होत नाही. त्यामुळे सुदैवानं रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या मुलांना कावासाकी होण्याची शक्यता असते. याशिवाय घरातील एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्या माध्यमातूनही मुलांना कावासाकी होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे.