सतत भीती वाटते...झाेपही उडालीय! भीतीमुळे मनातील घर झोपेला पोखरतं, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:09 IST2025-11-23T10:08:21+5:302025-11-23T10:09:07+5:30
झोप श्वासांसारखी शरीराची नैसर्गिक गरज आहे. मेंदू रिचार्ज करून शरीराच्या बारीक-सारीक व्यथा रोज दूर करण्याचे सामर्थ्य झोपेत आहे.

सतत भीती वाटते...झाेपही उडालीय! भीतीमुळे मनातील घर झोपेला पोखरतं, काय आहे कारण?
डॉ. सारिका दक्षीकर
मानसोपचारतज्ज्ञ
एक ३८ वर्षांची स्त्री निद्रानाशाची तक्रार घेऊन आली. ती इंटरव्ह्यू द्यायला एका ३२ मजली इमारतीच्या २८ व्या मजल्यावरील ऑफिसमध्ये बंद दाराच्या लिफ्टमधून गेली. जाताना सोबत मैत्रीण होती. त्यामुळे निभावले. आवडीचे क्षेत्र असल्याने इंटरव्ह्यू छान झाला. नोकरी मिळाल्याचा मेल आल्यावर मात्र भीतीने झोप उडाली. तिला लहानपणापासून अंधाराची, उंच ठिकाणांची खूप भीती वाटायची. अंधाराची भीती नैसर्गिक होती. लहाणपणी तिने एका नातेवाईकाला झाडावरून पडताना पाहिले. तेव्हापासून उंच ठिकाणांची भीती मनात बसली. कधी बंद दारांच्या लिफ्टची भीती, कधी गर्दीची भीती साचत गेली. पण योग्य उपाय झाले नाहीत. अवास्तव भीतीचा कडेलोट होऊन झोप उडाली अन् कामातून लक्ष उडालं. परिणामी आजारपण, थकवा. सतत कोणीतरी सोबत असावं लागायचं.
अनाठायी भीती (फोबिया) अनेक प्रकारची असते. गर्दीची, उंचीची, अपघाताची तसेच कुत्र्यांची, सरपटणाऱ्या प्राण्यांची, इंजेक्शनचीही असू शकते. भीतीमुळे मनातील घर झोपेला पोखरतं. मग कधी स्वप्नातून तीच भीती अनेकविध स्वरूपात समोर येते. अशा अनाठायी भीतीवर मानसोपचार आहेत हे अनेकांना माहित नसतं. अनेकदा अंधश्रद्धेचा आसरा घेतला जातो. योग्य समुपदेशन, बिहेव्हिरिअल थेरपी, प्रसंगी औषधोपचार यामुळे व्यक्ती पूर्ण बरी होऊ शकते.
झोप श्वासांसारखी शरीराची नैसर्गिक गरज आहे. मेंदू रिचार्ज करून शरीराच्या बारीक-सारीक व्यथा रोज दूर करण्याचे सामर्थ्य झोपेत आहे. अंथरुणात पडताच झोपू शकणाऱ्या व्यक्तीला नशीबवान म्हणतात. पण भीतीचं घर मनात असतं तेव्हा त्याचं प्रतिबिंब झोपेत उमटतं. तेलंगणातील दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेला मुंग्यांची इतकी भीती वाटत होती की, तिने आत्महत्या केली.
फोबियाचे प्रकार
ॲरॅक्नोफोबिया : कोळी पाहून किंवा त्यांच्या उपस्थितीने निर्माण होणारी भीती.
ॲक्रोफोबिया : उंच ठिकाणी गेल्यावर डोके फिरणे, घाम येणे.
क्लॉस्ट्रोफोबिया : बंद जागेत अडकण्याची भीती, लिफ्टमध्ये घाबरणे.
ॲगोराफोबिया : गर्दी, उघडी ठिकाणे किंवा बाहेर जाण्याची भीती.
हायड्रोफोबिया : पाण्याची तीव्र भीती.
ऑफिडिओफोबिया : साप पाहून घाबरणे.
थॅनॅटोफोबिया : मृत्यूची भीती.
सोशल फोबिया : लोकांसमोर बोलण्याची, लोकांच्या टीकेची भीती.
फिरॅकफोबिया : मुंग्यांची भीती.