मनात किती कचरा साठून आहे?...आणि का? त्याने मला साधा चहाही विचारला नव्हता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 08:27 IST2023-12-21T08:27:33+5:302023-12-21T08:27:47+5:30
हे प्रसंग कधीच संपून गेलेत, ती परिस्थितीही कधीच बदलली आहे.

मनात किती कचरा साठून आहे?...आणि का? त्याने मला साधा चहाही विचारला नव्हता...
‘मी त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याने मला साधा चहाही विचारला नव्हता. ’ – ही तीन वर्षांपूर्वीची गोष्ट!
‘मला अमुक ठिकाणी जायचं होतं, बाबांना सांगितलं, समजावून सांगितलं पण त्यांनी मला त्यासाठी पैसे दिले नाहीत.’ – ही अडतीस वर्षांपूर्वीची गोष्ट!
‘रुखवतात ही भांडी आहेत, पण ही भांडी नाहीत, असं तुमच्या घरच्यांनी आमच्या घरच्यांना बोलून दाखवलं होतं. -’ पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट!
- या गोष्टी म्हटलं तर खूप छोट्या, क्षुल्लक ; तरीही लक्षात राहतात... का ? कशासाठी?
हे प्रसंग कधीच संपून गेलेत, ती परिस्थितीही कधीच बदलली आहे.
‘त्या’च्या घरी चहा न पिणाऱ्याने नंतर किती तरी वेळा चहा प्यायला असेल. अडतीस वर्षांपूर्वी बाबांनी पैसे दिले नाहीत म्हणणारा माणूस आज नीट कमावतो आहे. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी त्याला जायचं होतं, तिथे तो अनेकदा जाऊनही आलेला आहे. पण तरी बाबांनी तेव्हा पैसे दिले नाहीत, हे शल्य मनात आहेच. रुखवताची भांडी घरातून कधीच विसरली गेली आहेत, पण मनात त्या प्रसंगाची बोच अजूनही आहेच!
अशा प्रकारच्या किती घटना अजूनही मनातली जागा अडवून बसल्या आहेत. या अशा वाक्यांमुळे मनातली ऊर्जा आजपर्यंत किती वेळा घटली आहे?
नवीन कल्पना सुचायला, रोजची कामं चांगल्या पद्धतीने पार पाडायला, सकारात्मक विचार करायला, राग – चिंता अशा नकारात्मक भावनांना बळी न पडता सकारात्मक विचार करायला लागायला, आयुष्यात चांगले बदल करायला खूप कष्ट लागतात. आपण सर्वच जण विविध पद्धतीने आयुष्य घडवण्याचा, सजवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी उत्साह गोळा करत असतो. ऊर्जा निर्माण करत असतो. आसपासची आव्हानात्मक परिस्थिती, वेगळ्या वृत्तीच्या व्यक्ती आणि त्यांच्याशी घडलेले अप्रिय संवाद, अचानक समोर आलेले पेचप्रसंग आणि संकटं, उद्याच्या भविष्याच्या योजना – यात आपण कायमच व्यग्र असतो. असा सगळा विचार करण्यासाठी आपल्याला मानसिक – भावनिक ऊर्जेची गरज असते. अशा वेळी ऊर्जा घटवणाऱ्या अडगळीतल्या आठवणी जपून ठेवण्याची खरंच गरज आहे का?
- डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com