हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर देतं संकेत, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो जीवाला धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 19:17 IST2025-09-11T19:14:18+5:302025-09-11T19:17:03+5:30
Heart Attack : आपले शरीर हृदयविकार येण्याआधी काही संकेत देतं, या संकेतांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर देतं संकेत, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो जीवाला धोका
Heart Attack : हृदयविकाराची (Heart Attack) लक्षणे ओळखण्यात हलगर्जीपणा किंवा वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे जीव जाण्याचा धोका आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हृदयाशी संबंधित आजारांबद्दल जागरुकता निर्माण केली जात आहे. सध्या अशा अनेक अॅडव्हान्स टेस्ट उपलब्ध आहेत, ज्याद्वारे वेळेत हृदयाच्या स्थितीबाबत माहिती मिळू शकते.
एवढेच नाही, तर आपले शरीरसुद्धा हृदयविकार येण्याआधी काही संकेत देतं. या संकेतांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाहीत. अनेक वेळा सामान्य वाटणारी ही लक्षणे हृदयविकाराची पूर्वसूचना असू शकतात. डॉक्टरांचे म्हणणं आहे की, काही वेळा हृदयविकार येण्याच्या महिनाभर आधीपासूनच काही लक्षणे दिसू लागतात.
डॉ. संजीव (चेअरमन, कार्डियोलॉजी विभाग, मारेंगो एशिया हॉस्पिटल, गुरुग्राम) यांच्या मते, एक सामान्य माणूसही शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांवरुन समजू शकतो की, हृदयावर संकट आहे.
महिनाभर आधी दिसणारी लक्षणे
काम करताना थकवा जाणवणे, थोडेसे काम केल्यावर दम लागणे, जबड्यात किंवा छातीत सौम्य वेदना होणे...ही लक्षणे हृदयविकार येण्यापूर्वीची असू शकतात. ही लक्षणे जर व्यायाम किंवा मेहनतीच्या वेळी वाढत असतील आणि विश्रांती घेतल्यावर कमी होत असतील, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
शरीराचे महत्त्वाचे संकेत
जर कसलाही मोठा शारीरिक परिश्रम न करताही थकवा वाटत असेल, अगदी छोट्या कामात दम लागत असेल, छातीत जळजळ किंवा जडपणा वाटत असेल, तर ही लक्षणे 'गॅस' किंवा 'अॅसिडिटी' समजून दुर्लक्ष करू नका. विशेषतः, एखादी हालचाल किंवा क्रिया केल्यावर लक्षणे वाढत असतील आणि विश्रांती घेतल्यावर ती कमी होत असतील, तर ती हृदयविकाराची सुरुवात समजावी.
हृदयविकाराची इतर लक्षणे
चालताना किंवा पायऱ्या चढताना छातीत दुखणे, छातीत जळजळ, दम लागणे, थकवा, जबड्यात, खांद्यात वेदना, ...ही लक्षणे जर श्रम करताना दिसत असतील आणि विश्रांतीनंतर लगेच बरी होत असतील, तर ही लक्षवेधी बाब आहे. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, अन्यथा जीव धोक्यात येऊ शकतो.
हृदयविकाराचे कारणे आणि बचावाचे उपाय
हृदयविकाराचे मुख्य कारणे :
- सिगारेट / तंबाखूचे सेवन
- जास्त कोलेस्ट्रॉल
- मधुमेह
- उच्च रक्तदाब
- तणाव
- निष्क्रीय / अस्वस्थ जीवनशैली
बचावाचे उपाय :
- नियमित तपासणी
- संतुलित आहार
- व्यायाम
- पुरेशी झोप
- धूम्रपान व तंबाखू टाळणे
- स्ट्रेस मॅनेजमेंट
या सवयी अंगिकारल्यास हृदयविकाराचा धोका कमी करता येतो.