Health Tips: पोटाच्या तक्रारींवर अत्यंत गुणकारी आले लिंबू पाचक घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 14:31 IST2022-09-16T14:31:25+5:302022-09-16T14:31:48+5:30
Health Tips: विशेषतः पावसाळ्यात तर काही जणांना बारमाही पोटाच्या तक्रारी असतात. अशांसाठी एक चमचा पाचक संजीवनी ठरते!

Health Tips: पोटाच्या तक्रारींवर अत्यंत गुणकारी आले लिंबू पाचक घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घ्या!
छोट्या मोठ्या शारीरिक व्याधींवर उठ सूट महागडी औषधे घेणाऱ्या आजच्या पिढीचा आयुर्वेदाकडे आणि आजीच्या बटव्याकडे कल वाढताना दिसत आहे. कारण रोगराई दरदिवशी वेगवेगळे रूप धारण करत आहे. अशा वेळी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हे जास्त इष्ट ठरते. आले लिंबू पाचक पोटाच्या तक्रारींवर रामबाण उपाय आहे. आल्याचे. लिंबाचे गुण पचनक्रिया सुधारतात शिवाय तापात तोंडाची गेलेली चवसुद्धा परत आणतात.
बाजारात आले लिंबू पाचक विकत मिळते. काही ठिकाणी ते दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यावर प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे त्याचे फायदे होण्याऐवजी तोटे जास्त होतात. अशा वेळी चांगल्या प्रतीचे उत्पादन घ्यावे किंवा घरच्या घरी बनवावे. हे पाचक बनवणे अतिशय सोपे आहे. एकदा करून ठेवले की महिना भर सहज टिकते. हे पाचक अधिक प्रमाणात घेऊन चालत नाही. कारण अतिप्रमाणात घेतल्याने शरीराचा दाह होऊ शकतो. अतिसार होऊ शकते. म्हणून सकाळी चहा घेण्याच्या अर्धा तास अंशपोटी एक चमचा रस पाण्यात टाकून घ्याव. आता हे पाचक कसे बनवायचे त्याची पद्धत जाणून घेऊ!
आले लिंबू पाचक
साहित्य :
- २०० ते २५० ग्रॅम आले,
- ६-७ रसरशीत मोठ्ठाली लिंबं,
- एक चमचा सैंधव (शेंदेलोण) मीठ,
- अर्धा चमचा हिंग.
कृती:
- आलं स्वच्छ धुवून व वाळवून घ्या. (सगळी माती निघण्यासाठी पाण्यात तासभर भिजत ठेवावं)
- आल्याच्या चकत्या/ काचऱ्या करून मिक्सरवर पेस्ट करून घ्यावी.
- पाणी अजिबात घालू नये.
- आल्याच्या पेस्टचा रस करून गाळून घ्यावा.
- लिंबं धुवून, पुसून रस काढावा.
- आल्याचा आणि लिंबाचा रस एकत्र करावा.
- त्यात शेंदेलोण आणि हिंग घालून मिक्स करावे.
- चव बघून लागल्यास मीठ घालावे.
- हे तयार पाचक फ्रीजमधे महिनाभर टिकते.