HEALTH : ब्रेस्ट इम्प्लांट : कॅन्सरचे माहेरघर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 15:44 IST2017-07-21T10:14:37+5:302017-07-21T15:44:37+5:30

आपलेही स्तन आकर्षक दिसावेत, असे आजच्या असंख्य तरुणींना वाटते, मात्र यामुळे कॅन्सर होऊ शकतो... जाणून घ्या सविस्तर !

HEALTH: Breast Implant: Cancer's Backyard! | HEALTH : ब्रेस्ट इम्प्लांट : कॅन्सरचे माहेरघर!

HEALTH : ब्रेस्ट इम्प्लांट : कॅन्सरचे माहेरघर!

ong>-रवींद्र मोरे 
आपले सौंदर्य वाढविण्यासाठी बॉलिवूडच्या अभिनेत्री आणि मॉडेल्स यांनी स्तनवृद्धीच्या शस्त्रक्रिया म्हणजेच ब्रेस्ट इम्प्लांट केले असून त्यांचाच आदर्श आजच्या तरुणींनीही डोळ्यासमोर ठेवला आहे. आपलेही स्तन आकर्षक दिसावेत, असे आजच्या असंख्य तरुणींना वाटते शिवाय यासाठी बऱ्याच तरुणी अतिआग्रही असतात. यामुळेच आज जगात मोठ्या प्रमाणावर ब्रेस्ट इम्प्लांट शस्त्रक्रिया होत आहेत. ब्रेस्ट इम्प्लांटची शस्त्रक्रिया ही कर्करोगामुळे स्तन काढून टाकल्यावर येणारा विद्रुपपणा दूर करण्यासाठी शोधली गेली. मात्र आज त्याचा वापर सौंदर्यवर्धनासाठी जास्त प्रमाणात होत आहे. 

जाणकारांच्या मते, एकट्या अमेरिकेत दरवर्षी ४ लाख स्त्रिया स्तनवृद्धी शस्त्रक्रिया करून घेतात. भारतीय स्त्रियांमध्येही ही क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक केंद्र कार्यरत झाली आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी सुमारे ७० हजार स्त्रिया दीड ते अडीच लाख रुपये खर्च करुन ही शस्त्रक्रिया करून घेतात. 

Image result for breast implant

या शस्त्रक्रियेत सिलिकॉनयुक्त रबरानं बनलेली, भरपूर ताणली जाईल अशी एक इलॅस्टिक पिशवी (सिलिकॉन इलॅस्टोमर) वापरली जाते. पहिल्या प्रकारात त्यामध्ये सलाइन म्हणजे क्षारयुक्त द्राव भरून ती हवी तेवढी फुगवली जाते. दुसऱ्या प्रकारात त्या पिशवीत सिलिकॉन भरून ती फुगवली जाते. दोन्ही प्रकारात शस्त्रक्रिया करून ती पिशवी स्तनाच्या आत बसवली जाते.  

ब्रेस्ट इम्प्लांट या शस्त्रक्रियेमुळे जरी सौंदर्यात भर पडत असेल, मात्र अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (एफडीए) एप्रिल २०१७ मध्ये एक विशेष अहवालात ब्रेस्ट इम्प्लांटबद्दल काही धोक्याच्या सूचना दिल्या आहेत.  

* इम्प्लांट केलेल्या पिशवीच्या शेजारील भागात कडक गाठी तयार होतात. त्यात शरीरातील कॅल्शियम जमा होऊन त्या दगडासारख्या टणक बनतात. स्तनांच्या मॅमोग्राफीमध्ये त्या कर्करोगाच्या गाठी असल्याचं निदान होऊ शकतं.

* इम्प्लांटच्या आजूबाजूचा स्तनातील नैसर्गिक मांसल भाग, त्वचा आकसून जाते. त्यामुळे स्तन अकारण कडक आणि घट्ट होतात.

* दोन्ही स्तनांचे आकार वेगवेगळे आणि असमान दिसू शकतात.

* शस्त्रक्रियेच्या जागेवर सातत्यानं खूप वेदना होत राहतात.

* छातीच्या बरगड्या वेड्यावाकड्या होतात. 

*सलाइन इम्प्लांटमधील पिशवीला छिद्र किंवा भेग पडून त्यामधून लिकेज होतं आणि त्यातील क्षारयुक्त द्राव बाहेर पाझरू लागतो. काही रुग्णात हे इम्प्लांट फुगा फुटावा तसे आतल्या आत फुटून जातात. त्यामुळे इम्प्लांट पूर्ण आकसून जातो.

*काही स्त्रियांमध्ये इम्प्लांट बसवलेला आहे, हे स्पष्ट कळू शकते.

*बाळंतपणानंतर बाळाला दूध पाजताना त्रास होतो.

*शस्त्रक्रियेच्या जागेत रक्ताच्या गाठी होणं, त्यात जंतूसंसर्ग होऊन पू होणं असे अनेक त्रास होऊ शकतात.
 
 * २०११ मध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार, ब्रेस्ट इम्प्लांटमुळे स्त्रियांना ‘अ‍ॅनाप्लास्टिक लार्ज सेल लिम्फोमा’ हा एक प्रकारचा कर्करोग होऊ शकतो, असं अमेरिकन एफडीएने जाहीर केले होते. याव्यतिरिक्त स्तनाचाच नव्हे, तर फुफ्फुसांचा किंवा पोटाचा कर्करोग होण्याचीदेखील शक्यता असते. 

याशिवाय सौंदर्य वाढविण्यासाठीचा हा प्रयत्न तात्परता ठरला आहे. जागतिक आकडेवारीनुसार, सिलिकॉन इम्प्लांट बसवलेल्या ४६ टक्के स्त्रियांमध्ये आणि सलाइन इम्प्लांटच्या २१ टक्के स्त्रियांना कमीत कमी तीन वर्षांनी पुन्हा शस्त्रक्रिया करून आपलं सौंदर्य व्यवस्थित करावे लागते.

हा धोका पत्करण्यापेक्षा, आहे त्या नैसर्गिक सौंदर्यातच राहावे किंवा अशी शस्त्रक्रिया करण्याअगोदर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

source : maharashtra times

Also Read : ​OMG : ​स्तन कर्करोगाने भारतात सर्वाधिक मृत्यू, जगात अव्वल !
                   : ​HEALTH : ब्रेस्ट कॅन्सरशिवाय ‘या’ ५ गंभीर समस्या आहेत ‘ब्रेस्ट’साठी त्रासदायक !

Web Title: HEALTH: Breast Implant: Cancer's Backyard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.