तुम्ही तुमचे थॅलेसेमिया स्टेटस तपासले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 08:08 IST2025-05-04T08:08:29+5:302025-05-04T08:08:39+5:30

पूर्ण आजार घालवणे अगदी शक्य आहे. सायप्रससारख्या लहानशा देशाने या आजाराची हकालपट्टी केली.

Have you checked your thalassemia status? | तुम्ही तुमचे थॅलेसेमिया स्टेटस तपासले का?

तुम्ही तुमचे थॅलेसेमिया स्टेटस तपासले का?

 - डॉ. मेधा शेटे
एमडी (पॅथॉलॉजी)

मुद्द्याची गोष्ट : ८ मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून ओळखला जातो. ‘साजरा केला जातो’ असे मी म्हणणार नाही. कारण यात साजरा करण्यासारखे काहीच नाही. या दिवशी या आजाराची सर्वांना ओळख करून द्यावी, त्या आजारासंबंधीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यामुळे या आजाराचा संपूर्ण नायनाट व्हावा, जग थॅलेसेमिया मुक्त व्हावे, तसेच या आजाराच्या विळख्यातून सर्वांची सुटका व्हावी यासाठी हा लेख प्रपंच.

पूर्ण आजार घालवणे अगदी शक्य आहे. सायप्रससारख्या लहानशा देशाने या आजाराची हकालपट्टी केली. सायप्रस थॅलेसेमिया मुक्त झाला. पण कसे ते पाहण्यासाठी आपल्याला या आजाराविषयी जाणून घेणे महत्त्वाचे  आहे. म्हणजेच त्यावर आपण काही काम करू शकतो.
थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक आजार आहे. तो आई-वडिलांकडून मुलांकडे येतो. आपल्या मुलांना हा वारसा मिळू नये असे जर वाटत असेल तर प्रथम आई-वडिलांनी आपण थॅलेसेमियाचे वाहक म्हणजेच ‘कॅरियर’ तर नाही ना हे जाणून घ्यायला पाहिजे. वारसा हक्काने येणारा हा आजार रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो. या आजारात हिमोग्लोबिनमधील ग्लोबिन हे जे प्रोटीन आहे ते अबनॉर्मल असते. त्यामुळे तांबड्या पेशी तयार होताना त्या विकृत म्हणजेच डिफेक्टिव्ह तयार होतात. अर्थात याला थॅलेसेमिया मेजर असे म्हणतात. या विकृत तांबड्या पेशी प्राणवायुशी संयोग करू शकत नाहीत. त्यामुळेच या आजाराची सर्व लक्षणे दिसतात. अर्थात हा आजार आई-वडील दोघेही थॅलेसेमिया ‘मायनर’ असल्यामुळे होतो. २५ टक्के मुले ‘मेजर’ होतात. आई-वडिलांनी मुलाला जन्म देण्यापूर्वी ही तपासणी करणे अगदी गरजेचे आहे. ही रक्ताची अगदी साधी सोपी सरळ टेस्ट आहे. त्यालाच HPLC किंवा हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी असे म्हणतात. ही तपासणी आयुष्यात एकदाच करावयाची आहे. जसा आपला रक्तगट बदलत नाही, त्याप्रमाणे आपले थॅलेसेमियाचे स्टेटसही बदलत नाही. मग का नाही करून घ्यायची ही तपासणी? जवळजवळ सर्व पॅथोलॉजी लॅबमध्ये ही टेस्ट होते. सरकारी हॉस्पिटलमध्ये तर ही तपासणी मोफत होते. माझी आपणा सर्वांना कळकळीची
विनंती आहे. या रोगापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर जाणून घ्या आपले थॅलेसेमिया स्टेटस !

टेस्टमध्ये जर आपण थॅलेसेमिया ‘मायनर’ निघालो तर दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या...
१. लग्न करताना आपल्या पार्टनरची ही तपासणी करून घ्यायला विसरायचे नाही.
२. डॉक्टरांकडे गेल्यावर तुम्ही थॅलेसेमिया ‘मायनर’ आहात हे सांगायला विसरायचे नाही.
कारण हिमोग्लोबिन वाढण्यासाठी लोह किंवा आयर्न देऊनही उपयोग होणार नाही. खूप वेळा डॉक्टरांना जेव्हा लोह देऊनही काहीजणांचे हिमोग्लोबिन वाढत नाही त्यावेळी मग ते ही थॅलेसेमियाची तपासणी करून घ्यायला सांगतात. गर्भारपणात तर सर्वच बायकांची अगदी पहिल्या काही आठवड्यातच ही टेस्ट व्हायला हवी.

थॅलेसेमियाची तपासणी कधी व्हायला हवी?
ही टेस्ट जन्माला आल्यावर जसा आपला रक्तगट तपासला जातो, त्याचबरोबर ही थॅलेसेमियाची तपासणी व्हायला हवी. समजा काही कारणांनी त्यावेळी नाही झाली तर महाविद्यालयात प्रवेश घेताना तरी ही तपासणी आवश्यक करावी. त्याशिवाय प्रवेशच देऊ नये. बरे तरीदेखील चाचणी केली नाही तर लग्नाआधी जसे हल्ली ‘प्री-वेडिंग शुटिंग’ करतात, त्या ऐवजी किंवा त्याबरोबरच प्री-वेडिंग समुपदेशन देखील करून घ्यावे. 
पत्रिकेतील गुण जुळतात का नाही हे बघण्यापेक्षा आपली गुणसूत्रे जुळतात (Genes) की नाही, हे बघून घेणे फार महत्त्वाचे आहे. सर्व मॅरेज ब्युरोंनी ही तपासणी करण्याचा आग्रह धरावा. तरीही नाही केली तर मॅरेज सर्टिफिकेट देताना ही तपासणी केल्याशिवाय ते सर्टिफिकेट देऊच नये. हे सगळे इतक्या आग्रहाने सांगायचे कारण तुमच्या लक्षात आलेच असेल.
तुमचे थॅलेसेमिया स्टेटस समजून घेणे आणि त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही नॉर्मल तरी असाल नाहीतर थॅलेसेमिया मायनर तरी असाल. थलेसेमिया मायनर हा काही आजार नाही. फक्त तुम्ही या गुणसूत्राचे वाहक आहात, इतकेच.

भारत थॅलेसेमियाची राजधानी...
भारतात थॅलेसेमियाचे सर्वात अधिक म्हणजे सव्वा लाख मुले आहेत. म्हणून भारताला थॅलेसेमियाची राजधानी म्हणतात. शिवाय दरवर्षी दहा ते पंधरा हजार मुलांची यात भर पडते आहे. कारण थॅलेसेमिया मेजर हा भयानक आजार आहे. 
त्यामुळे कितीतरी घरे उद्ध्वस्त झालेली आम्ही पाहिली आहेत. थॅलेसेमीया मेजर या आजारासाठी उपचार म्हणजे फक्त रक्त चढवणे. दुसऱ्याचे रक्त दर पंधरा ते वीस दिवसांनी घेणे. रक्त घेतल्यामुळे अनेक नको ते हिपेटायटिस किंवा एचआयव्हीसारखे आजार होतात आणि लोहाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसून येतात ते वेगळेच. 
या आजारासाठी रक्ताशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. आजतागायत कोणतेही औषध निघाले नाही. नाही म्हणायला अलीकडे बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा उपाय निघाला आहे, पण तो खूप खर्चिक आहे. वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च होतात. म्हणून त्या वाटेकडे न गेलेलेच बरे. या सगळ्याचा ताण त्या कुटुंबावर आणि त्यायोगे सर्व समाजावर पडतो.

Web Title: Have you checked your thalassemia status?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य