‘नसबंदी’ केलेले दोन कोटी मच्छर ‘गुगल’ हवेत सोडणार.. रोबोट्सच्या साहाय्यानं ‘फवारणी’..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 18:38 IST2017-07-25T18:29:04+5:302017-07-25T18:38:57+5:30
जगातला पहिलाच प्रयोग, भयानक आजार आणि साथीच्या रोगांना अटकाव घालण्याचा प्रयत्न

‘नसबंदी’ केलेले दोन कोटी मच्छर ‘गुगल’ हवेत सोडणार.. रोबोट्सच्या साहाय्यानं ‘फवारणी’..
- मयूर पठाडे
साला एक मच्छर.. या मच्छरांना आता करावं तरी काय? काहीही करा, कोणतेही उपचार करा, अगरबत्ती जाळा, नाहीतर घराचाच पार धूर करून टाका, पण हे डास काही घरातून निघायचं नाव घेत नाहीत! अख्ख्या जगातच त्यांनी पार उच्छाद मांडलाय..
झिका व्हायरस, डेंग्यू, चिकनगुनिया.. यासारख्या एकापेक्षा एक खतरनाक रोगांचा प्रसार करून माणसाची जगातील संख्या कमी करण्याचं ध्येयच जणू या मच्छरांनी हाती घेतलं आहे. काही केल्या त्यांच्यावर कंट्रोल करणं माणसाला शक्य होत नाहीए..
आता करावं तरी काय? कसे घालवावेत हे मच्छर? हे मच्छर मारण्यासाठी जगातलं सर्वात बलाढ्य सर्च इंजिन गुगलनंच आता पुढाकार घेतला आहे. आपल्या या मोहिमेला त्यांनी नाव दिलं आहे ‘डिबंग प्रोजेक्ट’!
‘अल्फाबेटस’ या गुगलच्या पॅरेंट कंपनीची ‘फ्रेस्नो’ ही सायन्सच्या संदर्भातील उपकंपनी. तिनं हा उपक्रम हाती घेतला आहे.
‘काट्यानं काटा काढावा’ तसाच हा प्रयोग आहे. मच्छरांची पैदास थांबवण्यासाठी मच्छरांचाच उपयोग केला जाणार असून त्यासाठी रोबोट्सचा उपयोग केला जाणार आहे.
जगातला अशा प्रकारचा हा पहिलाच आणि सर्वात अभिनव असा उपक्रम आहे. त्यासाठी कंपनीनं अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील फ्रेस्रो हा भाग त्यासाठी निवडला आहे. एकूण दोन टप्प्यात हा प्रयोग होईल. पहिल्या टप्प्यात ३०० एकर आणि दुसºया टप्प्यात ३०० एकर जागेत ही चाचणी घेतली जाणार आहे आणि त्यानंतर त्याचं फलित तपासलं जाणार आहे.
‘मच्छर मारण्याचा’ काय आहे हा प्रयोग?
१- प्रयोगशाळेत तयार केलेले तब्बल दोन कोटी नर मच्छर या परिसरात सोडण्यात येतील.
२- या साºयाच मच्छरांची पुनरुत्पादनाची क्षमता नष्ट केलेली असेल.
३- मादी डासांबरोबर या मच्छरांचा संयोग झाल्यानंतर अंडी फलित होणार नाहीत आणि मच्छरांचीही निर्मिती होणार नाही.
४- हे डास माणसांना चावणारे नसतील असं कंपनीचं म्हणणं आहे.
५- डेंग्यूचा प्रसार करणारे इडिस इजिप्ती डास २०१३मध्ये जगात सर्वप्रथम कॅलिफोर्निया येथे आढळले होते.
६- परिसरात मच्छर सोडण्याचा हा उपक्रम सुमारे पाच महिने चालणार आहे.
७- या मच्छरांची ‘फवारणी’ करण्यासाठी रोबोट्सचा वापर केला जाणार आहे.
८- यानंतर या प्रयोगाचं मूल्यमापनही केलं जाणार आहे.
९- या उपक्रमाला सुरुवातही झाली आहे..
१०- हा उपक्रम यशस्वी होईलच अशी कंपनीला खात्री असून जगभरात या उपक्रमांची पुनरावृत्ती केल्यास मच्छरांच्या त्रासातून सुटण्यासाठी आणि मच्छरमुक्तीसाठी याचा मोठा उपयोग होऊ शकेल असं त्यांचं म्हणणं आहे.प्रयोगशाळेतले हे डास माणसांना चावणार नाहीत.