१३ वर्षाखालील मुलांना स्मार्टफोन देणे तारुण्यात ठरतं अत्यंत धोकादायक; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:03 IST2025-07-22T18:43:00+5:302025-07-22T19:03:42+5:30
लहानपणी स्मार्टफोनचा वापर तरुणांमध्ये आत्महत्येचे विचार वाढवतो अशी धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे.

१३ वर्षाखालील मुलांना स्मार्टफोन देणे तारुण्यात ठरतं अत्यंत धोकादायक; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
Smartphone Effects on Children: तंत्रज्ञानाच्या युगात आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळत आहेत. लहान मुलं देखील सहजतेने हे स्मार्टफोन हाताळताना दिसतात. काही पालकांना याचं कौतुक वाटतं. मात्र जेव्हा लहान वयातच मुलांना मोबाईलच व्यसन लागतं तेव्हा पालक चितेंत पडतात. जगभरातील पालकांना सध्या हाच प्रश्न सतावताना दिसतो आहे. अशातच १३ वर्षांखालील स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांना किशोरावस्थेत मानसिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात अशी धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
मुलांचा १३ वर्षांच्या आधीपासून स्मार्टफोनचा वापर हा त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. जर्नल ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट अँड कॅपॅबिलिटीजमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमधून ही माहिती पुढे आली आहे. यानुसार, स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या १३ वर्षांखालील मुलांमध्ये आत्महत्येचे विचार, भावनिक नियंत्रणाचा अभाव, कमी झालेला स्वाभिमान आणि वास्तवापासून दूर राहणे यासारख्या समस्यांशी संबंधित असल्याचे आढळून आले. मुलांपेक्षा मुलींमध्ये हे प्रमाण जास्त दिसून आले. तसेच जितक्या लहान वयात एखादी व्यक्ती स्मार्टफोन घेते तितकेच त्याचे मानसिक आरोग्य कमकुवत होते.
संशोधकांनी १३ वर्षांखालील मुलांसाठी स्मार्टफोन प्रतिबंधित करण्यासाठी धोरणांची आवश्यकता असल्याचे म्हटलं आहे. यामध्ये मुलांना सोशल मिडिया किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून लांब ठेवण्यात यावं, असंही सांगण्यात आलं. या अभ्यासासाठी भारतातील १४,००० लोकांसह विविध देशांमधील १८-२४ वर्षे वयोगटातील १,३०,००० लोकांच्या मानसिक आरोग्याचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार ज्यांनी १२ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयात पहिला स्मार्टफोन घेतला त्यांच्यात आक्रमकता, वास्तवापासून अलिप्तता, भ्रम किंवा आत्महत्येचे विचार येण्याची शक्यता जास्त होती असं आढळून आलं.
"आमचे निष्कर्ष लहान मुलांसाठी स्मार्टफोन वापरावर निर्बंध घालण्यासाठी एक ठोस आधार आहे," असे सेपियन लॅब्सच्या मुख्य शास्त्रज्ञ तारा त्यागराजन म्हणाल्या. मुलांच्या दीर्घकालीन मानसिक आरोग्याला असलेले धोके इतके गंभीर आहेत की त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेगी थियागराजन म्हणाल्या.
या अभ्यासानुसार स्मार्टफोनच्या वापरामुळे मानसिक आरोग्य बिघडते. या अभ्यासात, सामाजिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य मोजणाऱ्या माइंड हेल्थ कोशिएंट नावाच्या साधनाचा वापर करून १ लाख तरुणांच्या मानसिक आरोग्याचे मूल्यांकन करण्यात आले. यावरुन असे दिसून आले की लहान वयात स्मार्टफोन घेतल्याने मुलींमध्ये अविश्वासाची भावना वाढते आणि त्या भावनिकदृष्ट्या कमकुवत होतात, तर मुले अस्थिर, अस्वस्थ आणि उदासीन किंवा रागीट होतात.
फ्रान्स, नेदरलँड्स, इटली आणि न्यूझीलंड सारख्या देशांनी शाळांमध्ये स्मार्टफोनच्या वापरावर बंदी घालण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी नियम लागू केले आहेत. अमेरिकेतील अनेक राज्यांनी शाळांमध्ये स्मार्टफोनच्या वापरावर मर्यादा घालणारे कायदे देखील केले आहेत.