लिंगबदल झाला, आता आवाजही बदलणार; डॉ. नूपुर नेरुरकर, ट्रान्स्वॉइस सर्जन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:05 IST2026-03-15T11:50:29+5:302026-03-15T12:05:11+5:30
त्यामुळे ती अस्वस्थता, तणाव अनुभवते. आवाज आणि लिंगओळख यांच्यातील ही विसंगती त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा मानसिक परिणाम करू शकते...

लिंगबदल झाला, आता आवाजही बदलणार; डॉ. नूपुर नेरुरकर, ट्रान्स्वॉइस सर्जन
ट्रान्सवुमन म्हणजे लिंगपरिवर्तित स्त्री. ज्या व्यक्तीचा जन्म पुरुष म्हणून झालेला असतो; पण त्या व्यक्तीची लिंग ओळख स्त्री म्हणून असते, अशा व्यक्तीला ट्रान्सवुमन म्हणतात. अनेक ट्रान्सवुमनना ‘व्होकल डिस्फोरिया’ हा मानसिक त्रास जाणवतो. म्हणजेच, व्यक्तीची लिंग ओळख स्त्रीची असते; परंतु आवाज पुरुषी. त्यामुळे ती अस्वस्थता, तणाव अनुभवते. आवाज आणि लिंगओळख यांच्यातील ही विसंगती त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा मानसिक परिणाम करू शकते.
ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या शारीरिक संक्रमणासाठी ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र ट्रान्सवुमनच्या बाबतीत इन्स्ट्रोजेन उपचारांचा आवाजावर फारसा परिणाम होत नाही. उलट ट्रान्समेनमध्ये टेस्टोस्टेरॉनमुळे आवाज जाड आणि खोल होतो. त्यामुळे ट्रान्सवुमनचा आवाज सहसा पूर्ववतच राहतो. म्हणूनच अनेक ट्रान्सवुमन आपल्या लिंगओळखीशी सुसंगत असा आवाज मिळवण्यासाठी इतर पर्यायांचा शोध घेतात. यासाठी सर्वांत महत्त्वाचा आणि प्राथमिक उपाय म्हणजे ‘स्पेशलाइज्ड व्हॉइस थेरपी.’ या थेरपीमध्ये आवाजाचे विविध घटक जसे की पिच (उंची), रिझोनन्स, इंटोनेशन आणि आवाजाची तीव्रता यांमध्ये बदल करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित व्हॉइस थेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव केल्यास ट्रान्सवुमन अधिक स्त्रीसुलभ आणि नैसर्गिक वाटणारा आवाज विकसित करू शकतात. हा उपचार पूर्णपणे विनाशस्त्रक्रिया आहे आणि योग्य पद्धतीने केल्यास तो अत्यंत प्रभावी ठरतो.
गेल्या काही वर्षांत वैद्यकीय विश्वात आमूलाग्र बदल झाले आहेत. काही अत्याधुनिक उपचार घेण्यासाठी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना परदेशात जावे लागायचे. ते सर्व उपचार आता भारतात उपलब्ध आहेत. काही वर्षांपासून लिंगबदल शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुषाची बाई झाली तरी मूळचा आवाज तसाच राहत होता. मात्र, त्यावरही आता वैद्यकीय विश्वाने उपाय शोधून काढला आहे. आवाज बदल ही ती शस्त्रक्रिया.
कव्हरस्टोरी -
काय आहे शस्त्रक्रिया?
आवाज बदलण्याच्या शस्त्रक्रियेत गळ्यावर चीर घेऊन स्वरयंत्रावर जाऊन शस्त्रकिया केली जात होती. त्यामध्ये स्वरांच्या दोरांना ताणले जात होते; पण आता ‘वेंडलर्स ग्लोटोप्लास्टी’ ही शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया जर्मनीतील कान-नाक-घसातज्ज्ञ जर्गन वेंडलर यांच्या नावावर आहे. यात गळ्यावर चीर घेतली जात नाही, एंडोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते. यात स्वरयंत्राच्या घडीची लांबी कमी केली जाते. त्यामुळे पुरुषांचा आवाज महिलांसारखा होतो.
भारतात अनेक ट्रान्सवुमनना या पर्यायांची माहिती सोशल मीडिया, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि सपोर्ट ग्रुप्सद्वारे मिळत आहे. त्यामुळे अधिकाधिक लोक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उपचार निवडत आहेत.
जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज
केवळ थेरपीच्या मदतीने स्त्रीसुलभ आवाज टिकवून ठेवणे काही वेळा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारे ठरू शकते. रोजच्या संभाषणात अपेक्षित पिच आणि रिझोनन्स राखण्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शिवाय हसणे, खोकला येणे, शिंक येणे किंवा घसा खाकरणे यांसारख्या अनैच्छिक क्रियांमध्ये आवाज पुन्हा पुरुषी स्वरूपाचा जाणवू शकतो. त्यामुळे काही ट्रान्सवुमनना सामाजिक परिस्थितीत चुकीच्या लिंगाने संबोधले जाण्याची धास्ती असते.
या अशा परिस्थितीत कायमस्वरूपी आणि तुलनेने सहज उपाय म्हणून ‘व्हॉइस फेमिनायझेशन सर्जरी’ हा पर्याय उपलब्ध आहे. आवाजाची पिच वाढवण्यासाठी स्वरयंत्रातील व्होकल फोल्डसच्या रचनेत बदल करणाऱ्या काही शस्त्रक्रिया विकसित करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी सर्वाधिक प्रचलित पद्धत ‘ वेंडलर ग्लॉटोप्लास्टी’ ही आहे.
ट्रान्सजेंडर केअर पॅकेज -
मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी विशेष उपचार पॅकेज उपलब्ध आहे. त्यामध्ये संपूर्ण व्हॉइस असेसमेंट, व्हॉइस थेरपी तसेच वेंडलर ग्लॉटोप्लास्टीसारख्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.