“भयगंड” अर्थात फोबिया...  सकारात्मक स्वयंसूचनेचा वापर शिकायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 12:37 IST2025-01-19T12:34:35+5:302025-01-19T12:37:02+5:30

मेंदूतल्या अमिग्डला आणि हिप्पोक्याम्पस या भागात एखादी भयकारी घटना, प्रसंग नोंदवून ठेवली जाते. त्याची अतार्किक कारणमीमांसा नोंदवून ठेवली जाते आणि तसा प्रसंग आला की अस्वस्थतेची लक्षणे सुरू.

"Fear" i.e. phobia...  You should learn to use positive self-suggestion. | “भयगंड” अर्थात फोबिया...  सकारात्मक स्वयंसूचनेचा वापर शिकायला हवा

“भयगंड” अर्थात फोबिया...  सकारात्मक स्वयंसूचनेचा वापर शिकायला हवा

- डॉ. विद्याधर बापट  
(मानसाेपचार तज्ज्ञ)

रात्री साडेदहा वाजता यार्दी वहिनींचा फोन आला. स्वर काळजीचा होता. “सर, हे पुन्हा नोकरी सोडतायत. उद्याच्या उद्या राजीनामा देणारेत. माझा धीरच सुटलाय. काय करायचं?” म्हंटल, “वहिनी काळजी करू नका. उद्या सकाळी या, मग बघू. “दुसऱ्या दिवशी दोघं क्लिनिकला आले. यार्दी घाबरलेले होते. म्हणालो आधी रिलॅक्स व्हा. काय झालंय, काय होतंय नीट सांगा बघू. काळजी करू नका, आपण मार्ग काढू. यार्दी बोलण्याच्या स्थितीत नव्हते. वहिनीनीच सुरुवात केली. “चांगली नोकरी, पगार उत्तम, पण सतत विमान प्रवास...”. “तोच तर प्रॉब्लेम आहे” यार्दी कसेबसे बोलले. दहा दिवसांनी कोलकात्याला जायचंय. प्रत्येक वेळेला विमानप्रवास म्हटलं की पोटात गोळा येतो. प्रवासाचा दिवस उजाडला की खचल्यासारखं होतं, विमानात बसलं की छातीत धडधडण, डोकं जड होणं, काहीतरी बरं वाईट होणार असं सुरू होतं. सहनशक्ती संपली, सोडून द्यावी ही नोकरी. 

यार्दी अगदी हतबल झाले होते. त्यांना समुपदेशनाची गरज होती. कदाचित दीर्घ काळ उपचारांचीही. कारण हा भयगंडाचा (फोबिया) चा प्रकार दिसत होता. काही गोष्टी मला आणि काही त्यांना स्वतःला कराव्या लागणार होत्या. दोघांनाही धीर दिला. यातून नक्की बाहेर पडता येईल. यार्दींना विचारलं “यार्दी, संख्या शास्त्रानुसार विमानांचे अपघात सर्वात कमी होतात की इतर वाहनांचे, म्हणजे रेल्वे, रस्त्यावरील वाहने वगैरेंचे? विमानांचे. बरोबर आहे? बरं मृत्यू टाळता येतो का? तुम्ही विमानाने नाही गेलात आणि मृत्यू येणार असेल तर टाळता येईल? आणि नसेलच येणार तर? विमानाने जायचंय ठरल्यावर जे काही छातीत धडधडतं, रक्तदाब वाढतो, मळमळल्या सारखं होतं ह्याची कारणं निर्माण होणाऱ्या भीतीत, मानसिक ताणात आहेत की शारीरिक? यार्दी थोडे विचारात पडले. पटत तर असावं पण एवढ्याने प्रश्न सुटणार नव्हता. भीतीचं मूळ खूप खोलवर रुजलं होतं. अन् ती अवास्तव, निराधार निरर्थक होती. 

शेवटी फोबिया म्हणजे तरी काय? विशिष्ट प्रसंग, घटना, गोष्टी, कृती वगैरेंची अकारण वाटणारी तीव्र भीती. अशी भीती जेंव्हा दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागते तेंव्हा व्यक्ती त्या घटनेपासून पळ काढू लागते. तेच यार्दींच्या बाबतीत घडत होतं. यार्दींना विमान प्रवासाचा जसा फोबिया तसा अनेकांना इतर उदा. बंद जागांची भीती, लिफ्टची भीती, जंतू संसर्गाची, मृत्यूची, कर्करोगाची, रक्ताची, अनोळखी ठिकाणांची, माणसांची. ही यादी प्रचंड मोठी आहे. पण ह्यावर मात नक्की करता येते. आणि ती करायला शिकायला हवं. जरूर भासल्यास वेळेवर तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. यार्दींच्या केसमध्ये माझ्याकडून अपेक्षित मदत मी नक्कीच करीन. पण यार्दींनी काय करायला हवं होतं? प्रथम ह्या फोबियावर मी मात करू शकेन हा विश्वास बाळगायला हवा. 

रिलॅक्स होण्याची तंत्रे शिकून घ्यायला हवीत, त्यांचा रियाझ करायला हवा आणि ती प्रसंगाला तोंड देताना वापरायला हवी, नियमित चल पद्धतीचा व्यायाम करायला हवा. ज्याने नैसर्गिकरीत्या चांगली संप्रेरके स्त्रवतील. सकारात्मक स्वयंसूचनेचा वापर शिकायला हवा. भीती वाटणाऱ्या प्रसंगाला आपण व्यवस्थित तोंड देत आहोत ह्या कल्पनाचित्राचा सतत मानसिक रियाझ करायला हवा. हळूहळू, आणि ठामपणे प्रसंगाला तोंड देण्याची सवय करावी. तज्ज्ञांची मदत घ्यावी. यार्दींनी हे सगळं केलं. मधे काही महिने गेले. परवा यार्दींचा हैदराबादहून फोन. “सर, यार्दी बोलतोय. आता सगळं मस्त चाललंय. महिन्यात पाच ट्रिपा मारल्या.. नो प्रोब्लेम !” 
 

Web Title: "Fear" i.e. phobia...  You should learn to use positive self-suggestion.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य