गव्हामुळे केस गळतात का? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 10:36 IST2025-03-02T10:36:08+5:302025-03-02T10:36:47+5:30

गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्हा चर्चेत आहे.

does wheat cause hair loss | गव्हामुळे केस गळतात का? 

गव्हामुळे केस गळतात का? 

डॉ. रचिता धुरत, त्वचारोग विभागप्रमुख, सायन रुग्णालय

गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्हा चर्चेत आहे. जिल्ह्यातील काही गावांमधील लोकांचे केस अचानक  गळायला लागले. या वृत्ताला देशपातळीवर प्रसिद्धी मिळाली. संशोधकांचे पथक गावांमध्ये पोहोचले. पंजाब आणि हरयाणा येथील गहू  रेशनिंग स्वरूपाने बुलढाणा जिल्ह्यांतील काही गावांमध्ये वितरित केला गेला. त्यातील सेलेनियम या खनिजाच्या अतिप्रमाणामुळे केसगळती  झाल्याचे संशोधनाअंती स्पष्ट झाले. 

सेलेनियम हा पाण्यात आणि अन्य काही पदार्थांमध्ये आढळणारा घटक असून, त्यामुळे निश्चितच तो अतिरिक्त प्रमाणात आढळल्याने केसाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्याचा थेट परिणाम म्हणजे केस गळणे हा होय. त्यामुळे केसाच्या वाढीवर परिणाम होतो. यामुळे केस हळूहळू गळू लागतात. 
मात्र, काही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. ते म्हणजे हा गहू ज्या सर्व ठिकाणी गेला आहे, त्यांचेसुद्धा केस गळाले आहेत का? हे पाहणे गरजेचे आहे. 

त्याबरोबरच जिथे हा केसगळतीचा प्रश्न उपस्थित झाला तिथेच मूतखड्याचेही प्रमाण  वाढीस लागल्याचे आढळून आले. सेलेनियम खनिजाचा हा प्रभाव होता, हे यातून स्पष्ट झाले. 

गळतीचे दोन प्रकार

जिथे सेलेनियमची बाधा झाली तेथील पाण्यात क्षार, शिसे आढळून येते.  बुलढाणाच्या रुग्णांमध्ये कसे केस गळालेत ते पाहणे गरजेचे आहे. 

केस गळतीतही काही प्रकार आहेत. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. ॲनाजेन इफ्लुव्हियम आणि टेलोजन इफ्लुव्हियम. ॲनाजेन इफ्लुव्हियममध्ये केस वाढीच्या अवस्थेत केस गळून पडतात. 
केसांचा पुंजका निघून काही दिवसांत टक्कल पडते. तर टेलोजन इफ्लुव्हियम ताणतणाव, हॉर्मोन्स बदल किंवा टप्प्याटप्प्याने केस गळतात. 

केस पुन्हा येतात 

सेलेनियममुळे केसगळती झाली असली आणि पूर्णपणे टक्कल पडले असले तरी नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. 
ज्या ठिकाणी सेलेनियम स्रोत आहे हे कळून आले असेल त्या गोष्टी बंद करणे गरजेचे आहे. कालांतराने तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्णपणे केस येतात. त्यासाठी विषारीपण असलेले कोणतेही खाद्यपदार्थ आणि पाणी पिऊ नये किंवा त्याचा वापर करू नये. 

केसगळती थांबविण्याकरिता पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे असणारा आहार घ्यावा. सोबत ताणतणाव कमी करत योग आणि व्यायाम करावा.

विषाक्तता हे कारण आहे का? 

सेलिनिअमसोबत अन्य काही हानिकारक खनिजेसुद्धा या ठिकाणच्या पाण्यात आढळून आली आहेत. त्यामुळे गव्हातील सेलिनिअम आणि पाण्यात आढळून येणाऱ्या अन्य धातूंमुळे केसगळती झाली आहे का, हे तपासणेसुद्धा गरजेचे आहे.
 
त्यासोबत ज्या पाण्याने भाज्या धुतल्या जातात त्यामध्येसुद्धा सेलिनिअम, क्षार जात आहेत का हेसुद्धा बघितले पाहिजे. 
मानवाचा थेट संबंध असलेल्या कुठल्याही पदार्थातील विषारीपण हे केसाच्या आरोग्याला हानिकारकच आहे. 

त्यासोबत जंतुनाशके कोणत्या प्रकारची किती प्रमाणात वापरली आहेत त्याचा खाद्यपदार्थांवर थेट काही परिणाम होतो याचा उलगडा होणे आवश्यक आहे. 

केसगळतीची सर्वसाधारण कारणे?

प्रदूषण, भेसळयुक्त खाद्यपदार्थ, पाण्यातील विषारीपण, काही वेळा आनुवंशिक, असंतुलित हार्मोन्स, जीवनसत्त्वाची कमतरता, ऑटोइम्युन आजार.   

Web Title: does wheat cause hair loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.