Doctors Day: Fight against Corona is succeeding! Greetings to the doctors who gave life to the patients | Doctors Day: कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी होतोय! रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना सलाम

Doctors Day: कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी होतोय! रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना सलाम

स्नेहा मोरे

शासकीय तसेच खासगी रूग्णालयांतील डॉक्टर गेले चार महिने कोरोनाशी अविरत लढत आहेत. या कोरोना योद्ध्यांच्या अथक परिश्रमामुळे या लढ्याला यश येत असल्याचे राज्यातील वाढत्या कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येवरून दिसून येत आहे. यापूर्वी आपल्या आरोग्य यंत्रणेने अशा अनेक संकटांचा सामना केला आहे. पण यंदाचा लढा हा फक्त आरोग्यविषयक नसून समाजाच्या मानसिकतेशीही जोडल्याचे निरीक्षण डॉक्टर नोंदवत आहे. कोरोनासोबत लढताना रूग्णांना धीर देणाऱ्या, सर्वस्वी त्यांचा आधार बनलेल्या या जीवनदूतांना ‘डॉक्टर्स डे’ निमित्त सलाम!

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्याच्या आरोग्य विभागासह, मुंबई महानगरपालिका व खासगी क्षेत्रातील डॉक्टरही अहोरात्र रुग्णसेवा देत आहेत. कोरोना संशयितांचा वेगाने शोध घेऊन क्वारंटाइन करणे, चाचणी पद्धतीत सुधारणा, वेगाने होणाºया चाचण्या आणि संशयितांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केले जाणारे सहायक उपचार यामुळे राज्याच्या कोरोनाविरोधातील लढ्याला यश येत असून कोरोना परतीच्या वाटेवर निघाला आहे. कोरोना चाचणीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यापासून पालिकेच्या रुग्णालयात मिळणाºया उत्तम सुविधा, दर्जेदार उपचार, पुरेसा व पोषक आहार आणि डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मिळणारी वागणूक यामुळे मिळणाºया आत्मविश्वासामुळेच आम्ही आता कोरोनामुक्त झालो आहोत, अशी भावना घरी गेलेले रुग्ण व्यक्त करीत आहेत. ‘कोरोना बरा होतो, त्यामुळे तुम्हीही घाबरू नका’, असे आवाहनही ‘कोरोनामुक्त’ झालेल्यांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाचे संकट रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तीन हजारांहून जास्त शिकाऊ डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी व परिचारिका यांना कोरोना हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. शिवाय १ हजार ७०९ डॉक्टर्स, नर्सेस यांचे प्रशिक्षण महापालिकेच्या केईएम, नायर, टिळक व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय या चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये देण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबईत वरळी, भायखळा, धारावी, माहीम, गोरेगाव, वांद्रे अशा अनेक ठिकाणी तात्पुरती कोविड रुग्णालये वेगाने उभारण्यात आली.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या अतिजवळच्या (हाय रिस्क) गटातील लक्षणे दिसत नसलेल्या व्यक्तीची चाचणी लगेच केल्यास ती निगेटिव्ह येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशी चाचणी क्वारंटाइन केल्यानंतर पाच दिवसांनी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यामुळे अशा व्यक्तीचे वैद्यकीय निदान अचूक येण्यास मदत होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात असलेल्या अतिजवळच्या (हाय रिस्क) कुटुंबातील अनेक व्यक्तींमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत नाहीत. अनेकदा लक्षणेविरहित वैद्यकीय चाचणी केली असता, ती लागण झाल्यापासून साधारणपणे सुरुवातीचे पाच दिवस ‘फॉल्स निगेटिव्ह’ येत असल्याचेही निदर्शनाला आले आहे.

ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, पण त्यांची वैद्यकीय चाचणी मात्र ‘निगेटिव्ह’ येत आहे; अशा चाचण्यांना वैद्यकीय परिभाषेत ‘फॉल्स निगेटिव्ह टेस्ट’ असे संबोधले जाते. त्यामुळे रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांच्या संपर्कातील हाय रिस्क गटातील व्यक्तींची वैद्यकीय चाचणी ही क्वारंटाइन केल्यानंतर पाच दिवसांनी करण्यात येत आहे. राज्यात असो वा मुंबईत यापूर्वीही वैद्यकीय क्षेत्राने विविध नैसर्गिक / मानवी आपत्तींची आव्हाने पेलून रुग्णसेवा दिली आहे. कोरोनाच्या काळातही हे आव्हान या योद्ध्यांनी पेलले. मात्र या वेळी संघर्ष केवळ आपत्तीशी नव्हता, तर समाजाच्या मानसिकतेशी, कोरड्या माणुसकीशी होता ही सल कायम राहील, असे डॉक्टर आवर्जून सांगतात. समाजाच्या मानसिकतेशी असलेली ही लढाई कोरोनाच्या काळापेक्षा अधिक कठीण आहे. कारण जेव्हा तासन्तास कर्तव्य बजावून डॉक्टर घरी येतात तेव्हा आजूबाजूच्या बोचºया नजरांना त्यांना तोंड द्यावे लागते तेव्हा उरात अश्रूंचा पूर आल्याशिवाय राहवत नाही. याही नजरांच्या पलीकडे जाऊन आता हे कटू सत्य डॉक्टरांसह अन्य फ्रंटलाइनर्सनेही स्वीकारले आहे. मात्र भविष्यात या मानसिकतेवर उपचार करण्याची वेळ येऊ नये, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. कोरोनाच्या काळात डॉक्टरांच्या वाट्याला या बोचºया नजरा आल्या आहेत, भविष्यात अन्य क्षेत्रांवर एखादी आपत्ती आली की अशीच परिस्थिती उद्भवू शकते.

मानसिकतेशी लढा द्यायला शिकले पाहिजे!
कोरोनासह जगायचे शिकताना या मानसिकतेशी लढा द्यायलाही आपण शिकले पाहिजे. त्यासाठी समाज बदलेल असा विचार न करता, आपण आपल्या घरातून, आपल्या चौकटीपासून बदलाची सुरुवात केली पाहिजे. तेव्हाच पुढच्या काळात कोणत्याही आपत्तीत लढणाºया प्रत्येकाला मानसिक, शारीरिक बळ देण्यासाठी सुदृढ समाज घडू शकतो.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Doctors Day: Fight against Corona is succeeding! Greetings to the doctors who gave life to the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.