कोरोना लसीचा बुस्टर डोस गंभीर रोगांवर ठरतोय परिणामकारक, 'लॅन्सेट'चा महत्त्वपूर्ण अहवाल समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 13:43 IST2021-11-01T13:42:19+5:302021-11-01T13:43:30+5:30
कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेऊन पाच महिन्यांहून अधिक काळ झालेल्या लोकांच्या तुलनेत बुस्टर डोस घेतलेल्यांना चांगला फायदा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना लसीचा बुस्टर डोस गंभीर रोगांवर ठरतोय परिणामकारक, 'लॅन्सेट'चा महत्त्वपूर्ण अहवाल समोर
कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेऊन पाच महिन्यांहून अधिक काळ झालेल्या लोकांच्या तुलनेत बुस्टर डोस घेतलेल्यांना चांगला फायदा होत असल्याची माहिती समोर आली आहे. बुस्टर डोस घेतलेल्यांमध्ये गंभीर स्वरुपाच्या आजारांची परिणामकारकता कमी करण्यास मदत होत असल्याचा महत्त्वपूर्ण अहवाल लॅन्सेटनं (Lancet) प्रसिद्ध केला आहे. लॅन्सेटमध्ये फायझर लसीच्या बुस्टर डोसच्या परिणामकारकतेचा एक सविस्तर अहवाल छापण्यात आला आहे. इस्राइलमधील क्लॅलिट संशोधन संस्था (Clalit Research Institute) आणि हावर्ड विद्यापीठातील (Harvard University) संशोधकांनी संयुक्तरित्या इस्राइलमध्ये बुस्टर डोसचा अभ्यास केला. इस्राइल कोरोना विरोधी लसीचा तिसरा म्हणजे बुस्टर डोस देण्यात सर्वात आघाडीवर आहे.
फायझर-बायोएनटेकचा (Pfizer-BioNTec) तिसऱ्या डोसच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यात आला आणि यात कोरोनासोबतच इतर सहव्याधी तसंच गंभीर आजारांवर लसीच्या उपयुक्ततेचा आढावा घेण्यात आला. नुकतंच बायोएनटेक कंपनीकडून बुस्टर डोसची सॅम्पल साइज वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. यात बुस्टर डोस सहव्याधींवर परिणामकारक आहे की नाही याची माहिती काही देण्यात आली नव्हती.
जुलै ३० ते २३ सप्टेंबर २०२१ मध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यात इस्राइल कोरोना व्हायरसच्या चौथ्या लाटेला सामोरं जात होता. डेल्टा व्हेरिअंटच्या प्रकोपानं देशात रुग्णसंख्या वाढली. यात संशोधकांनी तिसरा डोस घेतलेल्या ७,२६,३२१ जणांचं सर्वेक्षण केलं. यात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
फायझर लसीचे दोन डोस घेऊन पाच महिने उलटलेल्यांच्या तुलनेत ज्यांनी तिसरा डोस घेतला आहे त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता तब्बल ९३ टक्क्यांनी कमी होत असल्याचं दिसून आलं. तसंच गंभीर आजारांची शक्यता ९२ टक्क्यांनी कमी होते आणि मृत्यूची शक्यता ८१ टक्क्यांनी कमी होत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. लसीची परिणामकारता लिंग, वय आणि सहव्याधीनं ग्रासलेले रुग्ण अशा सर्वांमध्ये समान आढळून आल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.
"बुस्टर डोस कोरोना विषाणूच्या परिणामकारकतेवर प्रभावी ठरत असल्याचं अहवालातून सिद्ध झालं आहे", असं क्लॅलिट संशोधन संस्थेचे प्राध्यापक रॅन बॅलिसर म्हणाले. तसंच बुस्टर डोस घेण्यास नागरिकांमधील संभ्रमासाठी त्यांनी जनतेपर्यंत माहिती योग्य पद्धतीनं पोहोचत नसल्याच्या मोहिमेला जबाबदार धरलं आहे. तिसऱ्या डोसची परिणामकारकता आणि महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मोहिम राबवली गेली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.