कोरोना विषाणू पुन्हा परत येतोय? हाँगकाँग-सिंगापूरपासून थायलंडपर्यंत रुग्णसंख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:26 IST2025-05-19T18:25:50+5:302025-05-19T18:26:06+5:30
Covid 19: हाँगकाँगमध्ये कोव्हिडच्या प्रकरणांमध्ये 30 पट वाढ झाली आहे, तर सिंगापूर आणि थायलंडमध्येही संसर्ग वेगाने पसरत आहे.

कोरोना विषाणू पुन्हा परत येतोय? हाँगकाँग-सिंगापूरपासून थायलंडपर्यंत रुग्णसंख्येत वाढ
Covid 19: जगभरात लाखो लोकांचा जीव घेणारा कोरोना व्हायरस(कोव्हिड 19) पुन्हा एकदा चर्चेत आहे. हाँगकाँगमध्ये गेल्या 10 आठवड्यात दर आठवड्याला कोव्हिडच्या घटनांमध्ये 30 पेक्षा जास्त पटीने वाढ झाली आहे. ही वाढ केवळ हाँगकाँगपुरती मर्यादित नाही, तर सिंगापूरमध्येही एका आठवड्यात रुग्णसंख्येत सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चीन आणि थायलंडमधूनही कोव्हिडच्या वाढत्या रुग्णांच्या बातम्या येत आहेत.
हाँगकाँगमध्ये कोविडच्या संख्येत मोठी वाढ
10 मे 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात हाँगकाँगमध्ये एकूण 1024 कोव्हिड रुग्ण आढळले. मागील आठवड्यात हा आकडा 972 होता. मार्चच्या सुरुवातीला दर आठवड्याला फक्त 33 रुग्ण आढळत होते. म्हणजेच मार्चपासून रुग्णसंख्या सतत वाढत आहे.
सर्वात मोठी चिंता म्हणजे, येथे पॉजिटिव्हनेसचा दर सतत वाढत आहे. 1 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात, पॉझिटिव्हिटी दर फक्त 0.31% होता. 5 एप्रिलपर्यंत तो 5.09% पर्यंत वाढले आणि 10 मे रोजी संपलेल्या आठवड्यात ते 13.66% पर्यंत वाढले.
हाँगकाँग सरकारने लोकांना स्पष्टपणे सांगितले आहे की, प्रत्येकाने स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वैयक्तिक आणि आजूबाजूच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आपण स्वतःचे आणि इतरांचे कोविडपासून संरक्षण करू शकू.
रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर हाँगकाँग सरकारने उच्च जोखीम असलेल्या लोकांना, विशेषतः ज्यांना आधीच आजार आहे किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांना मागील डोस किंवा संसर्गानंतर किमान 6 महिन्यांनी कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेण्याचा सल्ला दिला आहे.
आशियातील इतर देशांमध्येही रुग्ण का वाढत आहेत?
सिंगापूरमध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या 27 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात 11,100 होती, जी 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 14,200 पर्यंत वाढली. याचा अर्थ आठवड्यात सुमारे 30% वाढ. एवढेच नाही तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही दररोज सरासरी 102 वरून 133 पर्यंत वाढली आहे. हे आकडे सिंगापूर सरकारचे आहेत.
सरकारचे म्हणणे आहे की ही वाढ अनेक कारणांमुळे असू शकते. जसे की लोकांमध्ये लसीकरणामुळे होणारी प्रतिकारशक्ती हळूहळू कमी होणे. सिंगापूरमध्ये सध्या पसरणारे सर्वात प्रचलित कोव्हिड प्रकार LF.7 आणि NB.1.8. दोन्हीही JN.1. थायलंडमध्येही अलिकडच्या सुट्ट्यांनंतर कोव्हिडच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.