Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क राहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 23:03 IST2020-05-04T23:02:38+5:302020-05-04T23:03:08+5:30
ऑरेंज झोन म्हणजे, १४ दिवसांत १५ पेक्षा जास्त रुग्ण आढळले नाही. ग्रीन झोन म्हणजे, २८ दिवसांत एकही रुग्ण आढळला नाही.

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क राहा!
डॉ. अमोल अन्नदाते
राज्यातील काही भाग हा ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये आहे. या भागात आता कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका १०० टक्के टळला, असे अनेकांना वाटत आहे. ऑरेंज झोन म्हणजे, १४ दिवसांत १५ पेक्षा जास्त रुग्ण आढळले नाही. ग्रीन झोन म्हणजे, २८ दिवसांत एकही रुग्ण आढळला नाही. रुग्णसंख्या कमी असल्याने स्थानिक उद्योगांना चालना मिळावी, म्हणून काही गोष्टींना परवानगी दिली आहे; पण याचा अर्थ इतर भागांतून अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीतून आपला बाधितांशी संपर्क येणारच नाही, म्हणून साजरीकरण करू नये व नियम धुडकावून लावू नये.
या दोन्ही झोनमधील लोकांनी पुढील गोष्टी पाळाव्या...
ज्या गोष्टी तालुक्याच्या ठिकाणी मिळतात, त्या खरेदी तिथेच कराव्या.
परवानगी असली, तरी अनावश्यक प्रवास टाळावा.
कुठल्याही झोनमध्ये दुचाकीवर एकाच व्यक्तीला परवानगी आहे, याचा विसर पडू देऊ नये.
परवानगी असली, तरी गरज नसलेल्या गोष्टी, कपडे, चैनीच्या गोष्टी ई-कॉमर्सच्या माध्यमातून मागवू नये.
कुरिअर व पोस्ट सेवा सर्व झोनमध्ये सुरू झाल्या असल्या, तरी अत्यावश्यक गोष्टींसाठीच याचा वापर करावा.
‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा नियम दारूच्या दुकानांवर सर्वांत जास्त तुडविला जाण्याची शक्यता आहे. मद्यविक्रेत्यांनी दुकानांभोवती लोक एकमेकांपासून लांब उभे राहतील, याची काळजी घ्यावी.
ताप, सर्दी, खोकला असलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडू नये. तिने स्वत:ला इतरांपासून १४ दिवस लांब ठेवावे.
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)