Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! व्हिटॅमिन डी घेण्यास हरकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:01 AM2020-05-07T01:01:35+5:302020-05-07T01:02:31+5:30

कोविड-१९’च्या निमित्ताने सगळ्यांनी विटामिन डी घेऊन ही विटामिन डी कमतरतेची साथ संपवता येईल.

Coronavirus: Understand ‘Corona’! It is okay to take vitamin D. | Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! व्हिटॅमिन डी घेण्यास हरकत नाही

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! व्हिटॅमिन डी घेण्यास हरकत नाही

googlenewsNext

डॉ. अमोल अन्नदाते

व्हिटॅमिन डी म्हणजेच ड जीवनसत्व हे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. व्हिटॅमिन डी घेतल्यावर कोरोना विषाणूचा संसर्ग होणारच नाही, असे म्हणता येणार नाही. पण तो झाला तर व्हिटॅमिन डीची पातळी शरीरात नॉर्मल असल्यास विषाणूशी लढण्यास त्या व्यक्तीचे शरीर अधिक सक्षम असेल. तसेच मृत्यूसाठी कारण ठरणारे ‘एआरडीएस’ म्हणजे फुफ्फुससाला इजा होऊन ती निकामी होण्याचे प्रमाणही व्हिटॅमिन डी शरीरात नॉर्मल असल्यास कमी होऊ शकते. याशिवाय कुठल्याही जंतुसंसर्गात थोड्या प्रमाणात स्त्रवणाऱ्या सायटोकाईन या घटकाचे बाधिताच्या शरीरात वादळ येते. याला सायटोकाईन स्टॉर्म असेच म्हणतात. हे थोपवण्यासाठीदेखील विटामिन डी उपयोगी पडते.

व्हिटॅमिन डी हे आपल्याला अन्नातून फारसे मिळत नाही. याचा महत्वाचा स्त्रोत असतो सूर्यप्रकाश. पण सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी रोज सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान कधीही अर्धा तास कमीत कमी (अर्ध्या बाहीचा पातळ शर्ट व अर्धी चड्डी) कपडे घालून त्वचेचा जास्तीत संपर्कप्रकाशाशी येऊ दिला पाहिजे. पण आजच्या युगात हे कोणालाही शक्य नाही. म्हणून देशातील ८० टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. खर तर या कमतरतेमुळे हाडांच्या अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून या साथीपूर्वी व्हिटॅमिन डी कमतरतेची दुर्लक्षित साथ अनेक दशकांपासून आपल्या देशात सुरु आहे. ‘कोविड-१९’च्या निमित्ताने सगळ्यांनी विटामिन डी घेऊन ही विटामिन डी कमतरतेची साथ संपवता येईल. यासाठी ६०,००० कव व्हिटॅमिन डी दर आठवड्याला ८ आठवडे १२ वर्षांपुढील सर्वांनी घेण्यास हरकत नाही. या नंतर दर महिन्याला एकदा ६०,००० कव घ्यावे. व्हिटॅमिन डी रिकाम्या पोटी घेऊ नये. जेवणानंतर घ्यावे कारण ते चरबीत विरघळणारे व्हिटॅमिन असल्याने जेवणासोबत शरीरात चांगल्या प्रकारे शोषून घेतले जाते. शक्य झाल्यास दर वाढदिवसाला आपल्या रक्तातील व्हिटॅमिन डीची पातळी तपासून घ्यावी. तिचे प्रमाण पुढीलप्रमाणे असावे.

अपेक्षित नॉर्मल पातळी : ५०-६० नॅनो ग्रॅम प्रति मिलीलीटर
पातळी कमी असणे : २०-३० नॅनो ग्रॅम प्रति मिली
तीव्र कमतरता : २० नॅनो ग्रॅम प्रति मिलीपेक्षा कमी
 
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

Web Title: Coronavirus: Understand ‘Corona’! It is okay to take vitamin D.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.