CoronaVirus News : सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 01:07 IST2020-07-17T01:06:43+5:302020-07-17T01:07:05+5:30
- डॉ. अमोल अन्नदाते (लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.) सध्या मुंबईसह राज्याच्या अनेक भागात सीरोसर्व्हीलंसचे काम केंद्र ...

CoronaVirus News : सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय?
- डॉ. अमोल अन्नदाते
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)
सध्या मुंबईसह राज्याच्या अनेक भागात सीरोसर्व्हीलंसचे काम केंद्र शासनातर्फे सुरू आहे. एखाद्या भागात किती लोकसंख्येला आता संसर्ग झाला आहे हे तपासणे म्हणजे सीरोसर्व्हीलंस होय.
हे कसे केले जाते ?
यासाठी बाधित झालेले तसेच न झालेले जनतेतून सहजगत्या कुठला ही व्यक्तींचा समूह निवडला जातो व त्यांच्या शरीरात संसर्ग होऊन गेला आहे हे व प्रतिकारशक्तीचे घटक - अँटिबॉडीचे प्रमाण तपासण्यात येते. त्यामुळे एखाद्या गावात किंवा शहरात किती लोक आता बाधित होऊन गेले आहेत याचा अंदाज येतो. तसेच या अँटिबॉडीचे प्रमाण जास्त आहे की कमी, हेही मोजले जाते.
याचा उपयोग काय होतो?
तीन गोष्टी यावरून समजतात किती टक्के जनता बाधित झाली आहे यावर प्रतिबंधाचे धोरण ठरवता येते.
सर्व समाजाची एकत्रित व बहुतांश लोकसंख्या संसर्गित झाल्याने निर्माण होणारी हर्ड इम्युनिटी म्हणजे सर्वांना सामूहिक प्रतिकारशक्ती बहाल करणारी कळप प्रतिकारशक्ती निर्माण होते आहे कि नाही हे लक्षात येते.
अँटिबॉडीचे प्रमाण किती निर्माण झाले आहे व किती काळ टिकते हे मोजून, एकदा संसर्ग झाल्यावर परत किती काळ संसर्ग होण्याची शक्यता हे लक्षात येते अर्थात पहिला संसर्ग किती काळ पुढच्या संसर्गापासून नैसर्गिक प्रतिकारशक्ती बहाल करतो हे लक्षात येते.
यावरून लस परिणामकारक राहील की नाही हे ही कळते. सीरोसर्व्हीलंसचे निष्कर्ष काय ?
लक्षणविरहीत संसर्ग झालेल्यांमध्ये अँटिबॉडीचे प्रमाण फारसे नाही व ते एक महिन्यापर्यंतच टिकते आहे व सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्यांमध्ये ही अँटिबॉडीचे प्रमाण असले तरी ते तीन महिन्यात कमी होते आहे.
याचा परिणाम काय होऊ शकतो?
सीरोसर्व्हीलंस सुरु असल्याने याचे अंतिम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. पण आतापर्यंतच्या मर्यादित निकालांवरून पहिल्या कोरोना संसगार्तून मिळणारी प्रतिकारशक्ती आयुष्यभर टिकेलच असे खात्रीशीर रित्या सांगता येत नाही. म्हणून संसर्गित झालेले व न झालेले असे दोन्ही गटांना प्रतिबंधाचे सर्व उपाय चालू ठेवणे गरजेचे आहे. अजून
६ महिने ते वर्षभर सीरोसर्व्हीलंसनंतर चित्र अजून स्पष्ट होईल.
सीरोसर्व्हीलंसला सहकार्य करा
काही भागांमध्ये कशासाठी रक्त घेत आहेत, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आम्हाला कुठे घेऊन जातील, अलगीकरण / विलगीकरण करतील अशा गैरसमज व भीतीमुळे नागरिकांना सहकार्य केले नाही व रक्ताचे नमुने देण्यास नकार दिला. पण ही रक्ताची तपासणी तुमच्या आताच्या संसर्गाच्या निदानासाठी नव्हे तर होऊन गेलेल्या संसर्गासाठी आहे. तसेच या चाचणीचा आधार घेऊन कोणालाही बळजबरीने रुग्णालयात दाखल केले जात नाही. म्हणून सर्वांनी शासकीय कर्मचारी येतील तेव्हा सहकार्य करावे.