चिंताजनक! भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ५० लाखांचा टप्पा, ८२ हजार मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 10:03 IST
गेल्या २४ तासांत ९० हजारांहून अधिक रुग्ण सापडल्याने देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० लाख २० हजार ३६० एवढी झाली आहे.
चिंताजनक! भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ५० लाखांचा टप्पा, ८२ हजार मृत्यू
ठळक मुद्देदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ५० लाखांचा टप्पा कोरोनामुळे देशात आतापर्यंत तब्बल ८२ हजार रुग्णांचा मृत्यू ५० लाख कोरोनाबाधितांपैकी ३९ लाख ४२ हजार ३६१ जणांनी केली कोरोनावर मात
नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाच्या संसर्गाचा कहर सुरूच असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडला. आहे. तसेच कोरोनामुळे देशात आतापर्यंत तब्बल ८२ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमधून ही भयावह माहिती समोर आली आहे.गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाच्या संसर्ग झालेल्या ९० हजार १२३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर या दिवसभरात तब्बल १२९० जणांचा मृत्यू झाला आहे. काल ९० हजारांहून अधिक रुग्ण सापडल्याने देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० लाख २० हजार ३६० एवढी झाली आहे. तर १२९० जणांच्या मृत्यूंमुळे कोरोनाबळींचा आकडा ८२ ह्जार ६६ वर पोहोचला आहे.
देशासाठी दिलासादायक बाब म्हणजे ५० लाख कोरोनाबाधितांपैकी ३९ लाख ४२ हजार ३६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशामध्ये कोरोनाचे ९ लाख ९५ हजार ९३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशातील काही राज्यांमध्ये कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांवर आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोनाचे २० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. मंगळवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या २० हजार ४८२नव्या रुग्णांचे निदान झाले असून, ५१५ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट ७० टक्क्यांच्या आसपास आहे. तर एकूण रुग्णांची संख्या ११ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.दरम्यान, कोरोनाबाबत सिरो सर्व्हेमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे .दिल्लीमध्ये ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या सिरो सर्व्हेनुसार कोरोनामुक्त झालेल्या ३० टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडी दिसून आलेल्या नाहीत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाविरोधात रोगप्रतिकारशक्ती विकसित होत असल्याचे गृहितक खोटे ठरले आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचेही समोर आले होते.