Corona Vaccination : कोरोना लसीकरणामुळे मुलांमध्ये 'ही' समस्या उद्भवत आहे का? शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:52 IST2022-02-23T14:51:13+5:302022-02-23T14:52:00+5:30
Corona Vaccination : कोरोना आणि लसीकरणाबाबत नवनवीन संशोधनेही दररोज समोर येत आहेत.

Corona Vaccination : कोरोना लसीकरणामुळे मुलांमध्ये 'ही' समस्या उद्भवत आहे का? शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर...
वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये आता घट होताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यामागे लसीकरणानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच, आता कोरोना आणि लसीकरणाबाबत नवनवीन संशोधनेही दररोज समोर येत आहेत. एका वृत्तानुसार, कोरोनाची लस घेतल्यानंतर मुलांमध्ये 'मल्टीसिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम' होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
'द लॅन्सेट चाइल्ड अँड एडोलसेंट हेल्थ'मध्ये प्रकाशित झालेल्या एका विश्लेषणात हा दावा करण्यात आला आहे. मुलांमध्ये, 'मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम'मुळे तापासोबत त्यांच्या किमान 2 अवयवांवर परिणाम होऊ शकतो आणि अनेकदा ओटीपोटात दुखणे, त्वचेवर पुरळ किंवा लाल डोळे इत्यादी लक्षणे दिसतात. कोरोनाची लागण झालेल्या मुलांमध्ये हे दिसून येते. दरम्यान, ही लक्षणे वयस्कर व्यक्तींमध्ये क्वचितच दिसतात. यामुळे कधीकधी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. परंतु बहुतेक रुग्ण बरे होतात.
ब्रिटेनमध्ये आले होते पहिले प्रकरण
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानुसार (CDC) यासंबंधीचे पहिले प्रकरण 2020 च्या सुरुवातीला ब्रिटेनमध्ये समोर आले होते. कधीकधी त्याची लक्षणे कावासाकी रोगाशी देखील संबंधित असतात, ज्यामुळे जळजळ आणि हृदयाच्या समस्या उद्भवतात. फेब्रुवारी 2020 पासून अमेरिकेत 'मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम' ची 6,800 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
CDC कडून संशोधन
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) आणि यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने कोरोना लसीकरण सेफ्टी मॉनिटर अंतर्गत प्रतिकूल लक्षणांच्या यादीमध्ये त्याचा समावेश केला आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्याची कोणतीही चिन्हे नसलेल्या लोकांमध्ये दिसलेली काही इतर लक्षणे रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र आणि इतर संशोधकांना नवीन विश्लेषण करण्यासाठी प्रेरित केले.
लसीचा सिंड्रोमशी काहीही संबंध नाही
वेंडरबिल्ट विद्यापीठातील बालरोग संसर्गजन्य रोग तज्ज्ञ आणि मुलांना देण्यात आलेल्या कोरोनावरील 'मॉडर्ना' लसीच्या अभ्यासाचे नेतृत्व करणारे डॉ. बडी क्रीच म्हणाले की, लसीमुळे असे घडले असण्याची शक्यता आहे, परंतु हा केवळ अनुमान आहे आणि विश्लेषणात याचा कोणताही पुरावा सापडला नाही. या आजाराशी लसीकरणाचा नेमका संबंध काय आहे, हे आम्हाला माहीत नाही. रुग्णाला यापूर्वी संसर्ग न झाल्यामुळे केवळ लसीकरण हेच कारण आहे, असे म्हणता येणार नाही.